सुरेश भटेवरा , नवी दिल्लीअर्थकारणाची दिशा बदलून देशातल्या गरीब वर्गाला त्याचे अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा महत्त्वाचा प्रयत्न मोदी सरकारने चालवला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सरकार व बँकांच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा झाला आहे. त्याचा यथायोग्य वापर पायाभूत सुविधांमधे व्यापक सुधारणा, गरीबांचे कल्याण व आरोग्य व शिक्षणाच्या आधुनिक सोयींसाठी होईल, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. पाच राज्यांच्या निवडणुका, महाराष्ट्र व ओडिशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल याचा भक्कम पुरावा आहे, असे प्रतिपादन राज्यसभेत भाजपचे अजय संचेती यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत केले.नोटाबंदी जाहीर झाली तेव्हा अर्थकारणात मोठा बॉम्बस्फोट झाल्यासारखे विरोधकांना वाटले, असे नमूद करत संचेती म्हणाले की, नोटाबंदीनंतर सरकारविरोधात टीकेचे काहूर उठवले गेले. निवडणुकीत हा मोठा मुद्दा बनवला गेला. प्रत्यक्षात सामान्य जनता व छोटे व्यापारी हालअपेष्टा सोसूनही या निर्णयाच्या पाठिशी उभे राहिले. रेटिंग एजन्सीजनी नोटाबंदीवर व्यक्त केलेले मत, सकल राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ आणि निवडणुकीचे ताजे निकाल यातून एकच गोष्ट स्पष्टपणे सिद्ध झाली की हा निर्णय देशहिताचा आहे.
नोटाबंदीचा निर्णय विकासासाठी क्रांतीकारक
By admin | Updated: March 17, 2017 01:26 IST