Join us  

Retail Inflation Rate: मोदी सरकारला मोठा दिलासा! पेट्रोल, डिझेल वाढत चालले तरी महागाई दर घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 7:22 PM

Retail Inflation Rate falls: आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या मुद्रा नीतिच्या समिक्षेत यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज 5.3 टक्के केला आहे. आधी हा 5.7 टक्के होता. महागाई कमी झाल्याने आरबीआयला देखील दिलासा मिळाला आहे.

फेस्टिव्ह सीझन सुरु झाला असून महागाईवर मोदी सरकारला दिलासा देणारी बातमी आली आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दरामध्ये (Retail Inflation Rate) मोठी घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये घाऊक महागाई दर 4.45 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 5.3 टक्के होता. एप्रिल 2021 नंतर सर्वात कमी दर हा सप्टेंबरमध्ये आला आहे. 

सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार खाण्या पिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्याने महागाई दरात घट झाली आहे. खाद्य महागाई सप्टेंबरमध्ये घसरून 0.68 टक्क्यांवर आली आहे. तर ऑगस्टमध्ये हा आकडा 3.11 टक्के होता. नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस (NSO) कडून 12 ऑक्टोबरला हे आकडे जारी करण्यात आले आहेत. 

आरबीआयने नुकत्याच जारी केलेल्या मुद्रा नीतिच्या समिक्षेत यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अंदाज 5.3 टक्के केला आहे. आधी हा 5.7 टक्के होता. महागाई कमी झाल्याने आरबीआयला देखील दिलासा मिळाला आहे. महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरबीआयने इंधन दर कमी करण्याची मागणी केली होती. आरबीआयला महागाई दर कमी करायचा होता. यामुळे रेपो रेटमध्ये काहीच बदल करण्यात आला नव्हता. रेपो रेट आधीप्रमाणेच 4 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के ठेवण्यात आला होता. आरबीआयने डिसेंबर 2020 पासूनच महागाई दर 4% (+2% किंवा -2%) चे लक्ष्य निर्धारित केले होते.

याशिवाय IIP (Index of Industrial Production) ऑगस्टमध्ये 11.9 टक्के झाले होते. जुलैमध्ये 11.5 टक्के होते. इंडस्ट्रियल प्रोडक्शनमध्ये चांगली बातमी आहे. ऑगस्टमध्ये मॅन्युफॅक्टरिंग सेक्टरमध्ये उत्पादन वाढून 9.7 टक्के झाले आहे. उर्जा उत्पादन 16 टक्के झाले आहे. 

टॅग्स :महागाईपेट्रोलडिझेल