Join us

किरकोळ महागाई दर ५ टक्क्यांवर

By admin | Updated: January 12, 2015 23:52 IST

किरकोळ महागाई दर वाढून डिसेंबरमध्ये ५ टक्क्यांवर गेला आहे. पालेभाज्या व फळे यासारखे अन्नपदार्थ महागल्याने ही वाढ नोंदली गेली.

नवी दिल्ली : किरकोळ महागाई दर वाढून डिसेंबरमध्ये ५ टक्क्यांवर गेला आहे. पालेभाज्या व फळे यासारखे अन्नपदार्थ महागल्याने ही वाढ नोंदली गेली.नोव्हेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर ४.३८ टक्के होता. जानेवारी २०१२ मध्ये सरकारने महागाई दर निश्चित करण्याची नवी पद्धती अवलंबल्यापासूनचा हा नीचांक होता. डिसेंबर २०१३ मध्ये किरकोळ महागाई ९.८७ टक्क्यांवर होती.किरकोळ महागाई वधारल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक आपल्या फेब्रुवारीच्या पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदरांत कपात करील, असे विश्लेषकांना वाटते. रिझर्व्ह बँक येत्या ३ फेब्रुवारी रोजी चालू आर्थिक वर्षातला सहावा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करणार आहे.सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाई वाढून डिसेंबर २०१४ मध्ये ४.७८ टक्के झाली. गेल्या महिन्यात ती ३.१४ टक्के होती. भाजीपाल्याच्या किरकोळ किमती ०.५८ टक्क्याने वाढल्या, तर नोव्हेंबरमध्ये यात १०.९ टक्के घट झाली होती. फळेही १४.८४ टक्क्यांनी महागली. अन्नधान्य व पेय श्रेणीतील महागाई दर वाढून डिसेंबरमध्ये ५ टक्के झाला. नोव्हेंबरमध्ये हा ३.५ टक्के होता. अंडी, मासे आणि मटण यासारख्या प्रथिनेयुक्त पदार्थांच्या किमती घटून ५.२४ टक्क्यांवर आल्या. नोव्हेंबरमध्ये हे प्रमाण ६.४८ टक्के होते. तेल श्रेणीतील पदार्थांच्या महागाईतही घट नोंदली गेली. (लोकमत न्यूज नेटवर्क)