Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात पाव टक्के कपात, गृह, वाहन कर्ज होणार स्वस्त

By admin | Updated: April 5, 2016 12:24 IST

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केल्याने गृह तसेच वाहन कर्जधारकांना दिलासा मिळणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - रिझर्व्ह बँकेने नव्या आर्थिक वर्षातील पहिला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला असून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची (0.25%) कपात करण्यात आली आहे. तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने  वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर रेपो रेट 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज तसेच वाहन कर्ज  स्वस्त होण्याची शक्यता असून कर्जधारकांना दिलासा मिळाला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी सकाळी पतधोरण जाहीर केले. आजच्या धोरणात व्याजाचा दर 0.50 टक्क्यांनी कमी होण्याची बाजारपेठेला अपेक्षा होती, मात्र रघुराम राजन यांनी पाव टक्क्यांचीच कपात घोषित केली. दरम्यान कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये (रोख राखीव प्रमाण) कोणताही बदल करण्यात आला नसून तो ४ टक्क्यांवर कायम आहे. 
अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही रिझर्व्ह बँकेकडून गेल्या आठवड्यात दर कपातीची अपेक्षा व्यक्त केली होती.
 
काय असतो रेपो रेट ?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
 
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना.. रिझर्व बँकही वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्या कर्जासाठी जो व्याजदर दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.