Join us  

रिझर्व्ह बँक व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सौम्य धोरणाची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 4:46 AM

पतधोरण समितीची बैठक सुरू

नवी दिल्ली : या आठवड्यात रिझर्व्ह बँकेकडून नव्या वित्त वर्षातील पहिले पतधोरण जाहीर केले जाणार असून, कोविड-१९ रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन धोरणात्मक व्याजदर कायम ठेवले जाऊ शकतात, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. यासाठीची बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. तीन दिवस या बैठकीत पतधोरणाबाबत चर्चा केली जाणार आहे.कोविड-१९मुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून सौम्य धोरण स्वीकारले जाण्याची शक्यता आहे, असे मिंटने जारी केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या तीनदिवसीय बैठकीनंतर येत्या ७ एप्रिल रोजी  वित्त वर्ष २०२१-२२ मधील पहिले दुमाही पतधोरण जाहीर केले जाणार आहे.कोटक म्युच्युअल फंडच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी तथा उत्पादन प्रमुख लक्ष्मी अय्यर यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यास प्राधान्य देऊ शकते. अर्थव्यवस्थेत पुरेशी गंगाजळी राहील याची खबरदारी घेणे आणि हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणणे यासाठीच्या उपाययोजना यावेळी अपेक्षित आहेत.रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या महिन्यातील आपल्या भाषणात म्हटले होते की, अर्थव्यवस्थेचे मजबूत पुनरुज्जीवन करण्यासाठी रिझर्व्ह बँक आपल्या हातातील सर्व साधनांचा वापर करील. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक