Join us

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदरांत कोणताही बदल नाही

By admin | Updated: June 7, 2016 12:19 IST

रिझर्व्ह बँकेने नव्या आर्थिक वर्षातील दुसरे द्वैमासिक धोरण जाहीर केले असून व्याजदरांत कोणताही बदल केलेला नाही.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नव्या आर्थिक वर्षातील दुसरे द्वैमासिक धोरण जाहीर करताना व्याजदरांत कोणताही बदल केलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट ६ टक्क्यांवर आणि रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसेच CRR किंवा कॅश रिझर्व्ह रेशोही चार टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
 
काय असतो रेपो रेट ?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
 
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना.. बँका त्यांच्याकडे असलेला जास्तीचा निधी ठेवींच्या रुपात रिझर्व बँककडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
 
सध्या जागतिक स्तरावर खनिज तेलाचे भाव वाढत असून आत्ताच तेलाचा भाव प्रति बॅरल 50 डॉलरच्या पुढे गेला आहे. यामुळे भविष्यात महागाई वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच सावधगिरीची उपाययोजना म्हणून व्याजदरात कपात न करता, रघुराम राजन यांनी ते कायम ठेवल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.