Join us

डेबिट कार्डप्रकरणी दहा दिवसांत अहवाल द्यावा

By admin | Updated: October 24, 2016 03:52 IST

डेबिट कार्डांच्या सुरक्षा उल्लंघनप्रकरणी अर्थमंत्रालयाने, रिझर्व्ह बँकेसह विविध एजन्सींना दहा दिवसांच्या आत अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत

नवी दिल्ली : डेबिट कार्डांच्या सुरक्षा उल्लंघनप्रकरणी अर्थमंत्रालयाने, रिझर्व्ह बँकेसह विविध एजन्सींना दहा दिवसांच्या आत अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ३२ लाख डेबिट कार्डस्च्या सुरक्षेचे उल्लंघन झाल्याप्रकरणी, याबाबतची माहिती मागविण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तांत्रिक तपासाचा अहवाल ८ ते १० दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. यातून पूर्ण घटनाक्रमाचे एक चित्र समोर येईल. यातील हॅकिंग किंंवा आणखी काही गडबड नेमकी कुठून झाली आहे, ते यातून स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, याबाबत याच आठवड्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते की, रिझर्व्ह बँक आणि अन्य बँकांना डेटाच्या असुरक्षिततेबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी काय तयारी करण्यात येत आहे, याची माहितीही मागविण्यात आली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकातील ३२ लाखांहून अधिक डेबिट कार्डच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे. भारतीय स्टेट बँकेसह काही बँकांनी मोठ्या संख्येने कार्ड परत घेतली आहेत, तर काही बँकांनी ही कार्डच ब्लॉक केली आहेत. अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना पिन बदलण्याचे आवाहन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)