Join us  

रेपोदर सध्या स्थिर, पण भविष्यात कपात अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 6:42 AM

रिझर्व्ह बँकेने दिला इशारा : पतधोरण जाहीर करताना घेतली कठोर भूमिका

मुंबई : अनेक अर्थतज्ज्ञांच्या भाकितांना धक्का देत रिझर्व्ह बँकेने रेपोदर सध्या स्थिर ठेवला आहे. मात्र, भविष्यात त्यात कपात अशक्य असल्याची कठोर भूमिका बँकेने जाहीर केली आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा मिळाला असला तरी भविष्यात उद्योजक आणि कर्जदारांना महाग कर्जांचा सामना करावा लागणार आहे.

बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या पतधोरणात रेपोदरासह सर्वच व्याजदर कायम ठेवले. बँक अन्य बँकांना कर्ज देताना जो व्याजदर आकारते त्याला रेपोदर म्हटले जाते. हा दर वाढला की बँकासुद्धा कर्जावरील व्याजदरात वाढ करतात. त्यातून कर्जे महाग होऊन क्रयशक्ती कमी होते व महागाई नियंत्रणात येते. सध्या इंधनदर भडकल्याने महागाई नियंत्रणासाठी रिझर्व्ह बँक रेपोदरात सलग तिसऱ्यांदा वाढ करेल, असा अंदाज होता.गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल म्हणाले की, महागाई दर ४ टक्क्यांहून अधिक राहू नये, हे बँकेचे लक्ष्य आहे. जुलै व आॅगस्टमध्यो दर कमी राहिला. आयात अधिक असली तरी जुलै ते सप्टेंबरमध्ये निर्यातीत समाधानकारक वाढ झाली आहे. खरिपाच्या पिकात १.९० टक्क्यांची वाढ आहे. आर्थिक स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळेच रेपोदर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवत आहोत. आॅक्टोबर ते मार्च २०१९ दरम्यान महागाई दर ३.९ ते ४.५ टक्के राहील व आर्थिक विकास दर ७.१ ते ७.३ टक्के असेल, असे बँकेचे म्हणणे आहे. या निर्णयाचा बँकिंग क्षेत्राला फटका बसला. रेपोदर वाढल्यास बँकांची मिळकत वाढते. पण तो दर स्थिर ठेवल्याने ही शक्यता मावळली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा बँकिंग निर्देशांक अखेरच्या अर्ध्या तासात ५३५ अंकांनी घसरला.निर्णयाच्या बाजूने ५ जणांनी केले मतदानबँकेची पतधोरण समिती गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्यासह सहा सदस्यांची आहे. त्यापैकी पाच सदस्यांनी रेपोदर स्थिर ठेवण्याच्या निर्णयाच्या बाजूने मत दिले, पण दर स्थिर ठेवताना भूमिका बदलण्यासंबंधी आणखी एका सदस्याने विरोध केला. भूमिका सामान्य न ठेवता कठोर करण्यासंबंधीच्या निर्णयाचा ४ विरुद्ध २ मतांनी विजय झाला. रेपोदर स्थिर असतील, तर किमान भूमिका बदलली जावी, असे सदस्यांचे मत होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक