Join us
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवड्याजवळच्या खराब रोडची मार्चपर्यंत दुरुस्ती

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

हायकोर्ट : महामार्ग प्राधिकरणच्या मुख्य महाव्यवस्थापकांची ग्वाही

हायकोर्ट : महामार्ग प्राधिकरणच्या मुख्य महाव्यवस्थापकांची ग्वाही

नागपूर : नागपूर-हैदराबाद महामार्गावरील पांढरकवड्याजवळच्या ३० किलोमीटर खराब रोडच्या दुरुस्तीचे काम ३१ मार्च २०१५, तर चौपदरीकरणाचे काम ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे मुख्य महाव्यवस्थापक एम. के. जैन यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.
१४ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने या रोडच्या दुरुस्ती कामाला चार आठवड्यांत सुरुवात करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, महामार्ग प्राधिकरणने निर्देशाचे पालन केले नाही. उलट पुन्हा चार आठवड्यांची मुदत वाढवून देण्याची विनंती केली. आदेशाचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता न्यायालयाने जैन यांना कारणे दाखवा नोटीस बजावून आदेशावर अंमलबजावणी का केली नाही याचे स्पष्टीकरण सादर करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जैन यांनी न्यायालयात हजेरी लावून वरील माहिती दिली. या कामाला प्राधिकरण अध्यक्षांनी दूरध्वनीवरून परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले. ही माहिती न्यायालयाने प्राधिकरणची ग्वाही म्हणून आदेशात नमूद केली आहे. ॲड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून मध्यस्थातर्फे ॲड. मोहित खजांची, तर प्राधिकरणतर्फे ॲड. अनीश कठाणे यांनी बाजू मांडली.
---------------------------
२४ डिसेंबरला पुढील सुनावणी
सातव्या क्रमांकाच्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर ते खवासापर्यंतच्या ३७ किलोमीटर खराब रोडची न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी याचिकेत मध्यस्थी अर्ज केला आहे. मध्यंतरी न्यायालयाने याचिकेचा विस्तार करून त्यात कोंढाळी उड्डाणपूल व पांढरकवड्याजवळच्या खराब रोडचा समावेश केला. मनसर-खवासा रोडचा आढावा घेण्यासाठी २४ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.