Join us

आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2017 04:29 IST

सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दोन आठवडे देशात मोदी उत्सव साजरा केला जात असला, तरी या काळात देशाची आर्थिक स्थिती कोलमडली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भाजपा सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दोन आठवडे देशात मोदी उत्सव साजरा केला जात असला, तरी या काळात देशाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. अशा स्थितीत मोदी सरकारने आर्थिक स्थितीबद्दलची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. उत्सव कसला साजरा करता?, जनतेला तीन वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ते सांगा, असेही ते म्हणाले.मोदी सरकारचे सगळे दावे फोल ठरले आहेत. ते फक्त जाहिरातबाजीत मग्न आहेत. मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणजेच तीन वर्षांत ६ कोटी लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित होते, पण प्रत्यक्षात लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. भाजपा सरकारने किती व कोणाकोणाला रोजगार दिला, याचा तपशील जाहीर करावा, असे आवाहनही शर्मा यांनी केले़ मोदी सरकारने १0 लाख रोजगारही दिलेले नाहीत. उलट नोटाबंदीमुळे अडीच कोटी लोकांचा रोजगार व व्यवसाय गेलेला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. जीडीपी खाली घसरलेला आहे. नवीन गुंतवणूक नाही, नवीन प्रकल्प नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. शेतकरी कर्जमाफी व शेतकरी संपाबाबत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सदाभाऊ खोत व मुख्यमंत्री फडणवीस यांनी संप तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपमही उपस्थित होते़