Join us  

रिलायन्स, एसबीआय फोर्ब्सच्या टॉप १०० मध्ये, जेपी मॉर्गन पहिल्या क्रमांकावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 1:49 PM

गतवर्षीची अव्वल बर्कशायर हॅथवे ३३८ व्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: फोर्ब्सने जारी केलेल्या ग्लोबल २००० यादीत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ४५ वे, तर भारतीय स्टेट बँकेने ७७ वे स्थान मिळवत टॉप १०० कंपन्यांमध्ये स्थान मिळवले. गतवर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज ४५ व्या स्थानासह पहिल्या १०० मध्ये एकमेव भारतीय कंपनी होती. यंदा एसबीआयने २८ स्थानांची प्रगती करत ७७ व्या स्थानी झेप घेतली आहे.

फोर्ब्सने २०२३ वर्षासाठी जगातील प्रमुख दोन हजार कंपन्यांची विक्री, नफा, मालमत्ता, भागभांडवल यानुसार यादी जारी केली. त्यात अमेरिकेतील सर्वांत मोठी बँक जेपी मॉर्गनने २०११ नंतर प्रथमच पहिला क्रमांक मिळवला. मागील वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेली वॉरेन बफेट यांची बर्कशायर हॅथवे समभाग घसरल्याने यंदा थेट ३३८ व्या क्रमांकावर घसरली. पहिल्या दहा कंपन्यांमध्ये प्रामुख्याने पाच बँकांचा समावेश आहे. 

५५ भारतीय कंपन्यांचा समावेश

फोर्ब्सच्या या यादीत भारतातील ५५ कंपन्यांचा समावेश आहे. पहिल्या दहामध्ये चार बँकांनी स्थान मिळवले. विशेष बाब म्हणजे रिलायन्सने या क्रमवारीत बीएमडब्ल्यू, नेस्ले, अलीबाबा समूह, प्रॉक्टर एंड गॅम्बल आणि सोनी या प्रमुख कंपन्यांना मागे टाकले आहे. 

टॅग्स :एसबीआयरिलायन्सफोर्ब्स