Join us  

जिओ सुस्साट! कोणालाही जमलं नाही ते करून दाखवलं; दिग्गजांना मागे टाकलं

By कुणाल गवाणकर | Published: January 30, 2021 12:53 PM

रिलायन्स जिओला १०० पैकी ९१.७ गुण; पहिल्या १० मध्ये एकमेव भारतीय ब्रँड

मुंबई: रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओची घोडदौड कायम आहे. देशात ५ जी स्पर्धेत काहीशी मागे पडलेल्या जिओनं जगातील सर्वात मजबूत ब्रँडच्या यादीत पाचवं स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे जिओनं अनेक दिग्गज बँड्सना मागे टाकलं आहे. यामध्ये ऍपल, ऍमेझॉन, डिस्ने, पेप्सी, नायकी, टेन्सेंट, अलीबाबा या ब्रँड्सचा समावेश आहे.ब्रँड फायनान्स ग्लोबलनं ५०० ब्रँड्सची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक मजबूत ब्रँड म्हणून व्ही चॅट पहिल्या स्थानी आहे. व्ही चॅट या मेसेजिंग ऍपची निर्मिती टेन्सेंटनं केली आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जगप्रसिद्ध फेरारीचा क्रमांक लागतो. त्यानंतर Sber ही रशियन बँकिंग कंपनी तिसऱ्या स्थानावर आहे. कोकाकोला चौथ्या, तर जिओ पाचव्या स्थानावर आहे. यानंतर डेलॉईट, लेगो, ऍमेझॉन, डिस्ने आणि ईवाय या ब्रँड्सचा टॉप १० मध्ये समावेश आहे.सर्वाधिक मजबूत ब्रँड्सची यादी जाहीर करताना काही महत्त्वाचे निकष विचारात घेतले जातात. ब्रँडची प्रतिष्ठा, शिफारस, नाविन्य, ग्राहकांना दिली जाणारी सेवा अशा निकषांचा विचार करून मजबूत ब्रँड्स निवडले जातात. त्यासाठी १०० पैकी गुण दिले जातात. यामध्ये जिओला ९१.७ गुण मिळाले. रिलायन्सनं २०१६ मध्ये जिओ ब्रँड बाजारात आणला. लॉन्चिंगनंतरच्या अवघ्या ४ वर्षांतच जिओनं जोरदार मुसंडी मारत मजबूत ब्रँडच्या यादीत पहिल्या पाचात स्थान मिळवलं. या यादीतील पहिल्या १० मध्ये जिओ हा एकमेव भारतीय ब्रँड आहे. 

टॅग्स :रिलायन्स जिओमुकेश अंबानीअ‍ॅमेझॉन