Join us

रिलायन्स जिओ - इनकमिंग कॉललाही पैसे पडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 17:27 IST

व्हॉइस कॉलसाठी किती डेटा वापरला जातो आणि त्यासाठी ग्राहक किती पैसे मोजतो याचा अनुभव आल्यावरच सत्य काय आहे याचा उलगडा होईल

योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - रिलायन्सच्या जिओच्या आगमनानं बाजारात खळबळ उडाली आहे. जिओमध्ये व्हॉइस कॉल्स फ्री असणार आणि फक्त डेटाचे पैसे भरावे लागणार असं सांगण्यात येत आहे. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते, व्हॉइस कॉल फ्री असतील हे अर्धसत्य आहे. कारण व्हॉइस कॉल करतानाही तो डेटाच्या माध्यमातून केला जात असल्याने डेटा वापरला जाणार म्हणजेच जितक्या पैशाचा डेटा व्हॉइस कॉलसाठी वापरला जाईल तितक्या पैशाला तो कॉल पडेल. विशेष म्हणजे, व्हॉइस कॉलसाठी डेटा वापरण्यात येणार असेल तर इनकमिंग कॉलपण डेटाच्या दरांप्रमाणे चार्जेबल असेल, असे मत टेक्नोस्मार्ट कन्सल्टिंगचे संस्थापक मंदार जोशी यांनी व्यक्त केलं आहे.
जोशींच्या मते जगात फुकट काहीच नसतं, त्यामुळे व्हॉइस कॉल फुकट आहेत असं समजायचं कारण नाही. व्हॉइस कॉलसाठी किती डेटा वापरला जातो आणि त्यासाठी ग्राहक किती पैसे मोजतो याचा अनुभव आल्यावरच सत्य काय आहे याचा उलगडा होईल असं जोशींनी म्हटलं आहे.
हे म्हणजे थोडक्यात व्हॉट्स अॅपच्या कॉलिंगसारखं असेल. व्हॉट्स अॅपवरून कॉल केला तर व्हॉइस कॉल होत नाही, तो डेटा कॉल होतो, त्यामुळे जितका डेटा वापरला जातो तितक्याचे पैसे प्लॅननुसार ग्राहकाला भरावे लागतात. ज्यावेळी ग्राहक हे फोन आणि कंपनीने ऑफर केलेले प्लॅन वापरेल आणि प्रत्यक्षात एका महिन्यात व्हॉइस कॉल करेल, डेटा वापरेल तेव्हाच लक्षात येईल की रिलायन्स जिओ अत्यंत स्वस्त आहे की इतरांमध्ये नी यात फारसं अंतर नाही.