Join us  

विभागीय ग्रामीण बँकांना २२०६ कोटींचा तोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 2:13 AM

गेली अनेक वर्षे या बँका तोट्यामध्ये असून, त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

मुंबई : देशातील विभागीय ग्रामीण बॅकांना गत आर्थिक वर्षात २२०६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आधीच्या वर्षापेक्षा या बँकांचा तोटा १५५४ कोटी रुपयांनी वाढल्याचे नाबार्डने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेली अनेक वर्षे या बँका तोट्यामध्ये असून, त्यांना सक्षम करण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) नुकतीच विभागीय ग्रामीण बँकांच्या तोट्याबाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये सन २०१९-२० या वर्षामध्ये देशातील विभागीय ग्रामीण बँकांचा एकूण तोटा २२०६ कोटी रुपये झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याआधीच्या वर्षी या बँकांचा तोटा ६५२ कोटी रुपयांचा होता. याचाच अर्थ या एका वर्षात या बँकांचा तोटा १५५४ कोटी रुपयांनी वाढला आहे.सन २०१९-२० या वर्षामध्ये विभागीय ग्रामीण बँकांची उलाढाल ७.७७ लाख कोटी रुपये एवढी राहिली. त्यामध्ये ८.६ टक्के एवढी वाढ झाली आहे. त्याआधीच्या वर्षी (सन २०१८-१९) या बँकांच्या उलाढालीतील वाढ ९.५ टक्के होती.या बँकाकडील अनुत्पादक कर्जे या वर्षात थोड्या प्रमाणात कमी झालेली दिसून येत आहे. मार्च २०२० अखेर अनुत्पादक कर्जांचे प्रमाण १०.४ टक्के एवढे राहिले आहे. आधीच्या वर्षात हे प्रमाण १०.८ टक्के एवढे होते. या बँकांनी अनुत्पादक कर्जाचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्देश दिलेले आहेत.६८५ जिल्ह्यांमध्ये विस्तारच्देशभरात २६ राज्य आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या ६८५ जिल्ह्यांत ४५ विभागीय ग्रामीण बँका कार्यरत आहेत. १५ व्यापारी बँकांनी या बँका निर्माण केल्या असून, त्यांच्या २१,८५० शाखा आहेत. या वर्षामध्ये या बँकाकडील ठेवीमध्ये १०.२ टक्क्यांनी तर कर्जवाटपात ९.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.