Join us

कितीही असो किंमत, घरांची खरेदी जोरात; यंदा रेकॉर्ड विक्री, महाराष्ट्रातील दोन शहरे आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:01 AM

२०२२ मध्ये ३,६४,८७० घरांची विक्री झाली होती.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशातील सात प्रमुख महानगरांत घरांच्या विक्रीत यंदा तब्बल ३१ टक्के वाढ झाली आहे. घरांच्या किमतीत सरासरी १५ टक्के वाढ झालेली असतानाही यंदा वर्षभरात ४.७७ लाख घरांची विक्री झाली. रिअल इस्टेट सल्लागार संस्था अनाॅरॉकने ही माहिती जारी केली आहे. त्यानुसार, २०२३ मध्ये ४,७६,५३० घरांची विक्री झाली. हा घर विक्रीचा सार्वकालिक उच्चांक आहे. २०२२ मध्ये ३,६४,८७० घरांची विक्री झाली होती.

अनॉरॉकचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, ‘जागतिक पातळीवरील प्रतिकूल स्थिती, देशांतर्गत संपत्तीच्या वाढत्या किमती आणि पहिल्या सहामाहीत व्याजदरात झालेली वाढ अशा अडचणी असतानाही २०२३ मध्ये घरांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.’

मुंबई अग्रस्थानी

देशातील ७ महानगरांपैकी मुंबई महानगर क्षेत्रात (एमएमआर) सर्वाधिक घरविक्री झाली. दुसऱ्या स्थानावर पुणे राहिले. १,५३,८७० घरांची विक्री एमएमआरमध्ये झाली. १,०९,७३० घरे मागच्या वर्षी विकली गेली होती. 

दिल्लीत घरविक्रीची वाढ झाली कमी

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) घरविक्री अवघी ३ टक्के वाढली. येथे ६५,६२५ घरे विकली गेली. मागच्या वर्षी हा आकडा ६३,७१० इतका होता. बंगळुरूत २९ टक्के वाढीसह ६३,९८० घरांची विक्री झाली. आदल्या वर्षी ४९,४८० घरे विकली गेली होती. कोलकात्यात ९ टक्के वाढीसह २३,०३० घरांची विक्री झाली. आदल्या वर्षी हा आकडा २१,२२० इतका होता. चेन्नईत ३४ टक्के वाढीसह २१,६३० घरांची विक्री झाली. आदल्या वर्षी ती १६,१०० इतकी होती.

 

टॅग्स :व्यवसाय