Join us

खरीप गाठणार विक्रम, देशात अन्नधान्याचे उत्पादन वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 01:06 IST

नवी दिल्ली : चालू खरीप हंगामात २०१७-१८ मध्ये देशात अन्नधान्याचे उत्पादन गतवर्षीच्या १३ कोटी ८० लाख टनांच्या विक्रमाच्या पुढे जाऊ शकते, असे मत कृषी सचिव शोभना पटनायक यांनी व्यक्त केले आहे. यंदा झालेल्या समाधानकारक पेरण्या आणि सलग दुसºया वर्षी चांगल्या मान्सूनमुळे हे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पटनायक यांनी सांगितले की, भातपीक, डाळी, कापूस, ऊस, तीळ आदी खरीप पिकांची ८० टक्केपेक्षा अधिक पेरणी पूर्ण झालेली आहे. देशात पुरामुळे १९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाणी कमी झाल्यानंतर, या भागातील शेतकºयांकडून दुसरे पीक घेतले जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या काही भागात कमी पाऊस झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. दक्षिण कर्नाटकच्या काही भागांत अद्यापही हे संकट कायम आहे.कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गत आठवड्यापर्यंत शेतकºयांनी ८७८.२३ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी केली आहे. गत वर्षी याच काळात ८५५.८५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. खरीपातील प्रमुख भातपीकाची पेरणी पूर्वीच्या २६६.९३ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा २८०.०३ लाख हेक्टरवर झाली आहे, तर डाळींची पेरणी मागच्या ११६.९५ लाख हेक्टरच्या तुलनेत १२१.२८ लाख हेक्टरवर करण्यात आली आहे.तेलबियांची पेरणी मागील आठवड्यांपर्यंत कमी होऊन १४८.८८ लाख हेक्टर झाली आहे. गत वर्षी ती १६५.४९ लाख हेक्टर होती.अर्थात, काही पिकांसाठी काही भागात अजूनही पेरण्या होऊ शकतात. डाळींची पेरणी समाधानकारक असली, तरी तूर डाळीचे प्रमाण कमी आहे. नगदी पिकांबाबत त्यांनीसांगितले की, कापूस आणिऊस यांची पेरणी चांगल्या प्रमाणात झाली असून, उत्पादनही चांगले होण्याची शक्यता आहे. कापसाची पेरणी समाधानकारक असली, तरी गुजरातमधील काही भागातील या पेरण्यांना पुराचा फटका बसला आहे. येथील शेतकरी डाळींसारखा पर्याय शोधू शकतात.आकडेवारी सांगते...कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार, चांगला मान्सून आणि किंमत मिळाल्याने कापसाची पेरणी गतवर्षीच्या ९६.४८ लाख हेक्टरच्या तुलनेत खरीपासाठी २०१७-१८ मध्ये आतापर्यंत ११४.३४ लाख हेक्टर झाली आहे. उसाचे क्षेत्र पूर्वीच्या ४५.६४ लाख हेक्टरच्या तुलनेत वाढून आतापर्यंत ४९.७१ लाख हेक्टर झाले आहे.