नवी दिल्ली : रिअल्टी क्षेत्रात कंपन्यांनी संगनमत करून ग्राहकांच्या हिताला बाधा येईल, असे वर्तन केल्याप्रकरणी स्पर्धा आयोयाने २0 कंपन्यांना निगराणीखाली आणले आहे. या प्रकरणाची सुनावणीही पूर्ण होत आली आहे. आयोगाचा लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आयोगाने अनेक रिअल्टी कंपन्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्याची व्यक्तिगत सुनावणी घेण्यात आली. सुनावणीची प्रक्रिया आता पूर्ण होत आली आहे. त्यावर आयोगाकडून लवकरच निर्णय दिला जाऊ शकतो. संबंधित कंपन्यांकडून आयोगाने लेखी उत्तर मागितले होते. बहुतांश कंपन्यांनी उत्तर दाखल केले आहे. कंपन्यांविरोधात विविध प्रकारचे आरोप आहेत. फ्लॅट, अपार्टमेंट अथवा अन्य स्वरूपाच्या रहिवासी मालमत्तांशी संबंधित करारात ग्राहकांच्या हिताची पायमल्ली करणे हा त्यातील प्रमुख आरोप आहे. केवळ कंपन्यांच्या हिताचे एकतर्फी नियम करणे, तसेच करार करून घेणे आणि स्पर्धेला मारक कृती करणे यांचा त्यामध्ये समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)