Join us

ईपीएफ सदस्यांना पाहता येणार खात्यांचा ‘रिअल टाईम’ हिशेब

By admin | Updated: October 6, 2014 02:28 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असलेल्या चार कोटींहून अधिक कामगार- कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंड खात्यातील नोंदी ज्या वेळी होतील त्याच वेळी (रिअल टाईम) कळू शकणार आहेत

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असलेल्या चार कोटींहून अधिक कामगार- कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंड खात्यातील नोंदी ज्या वेळी होतील त्याच वेळी (रिअल टाईम) कळू शकणार आहेत. ‘ईपीएफओ’ने केवळ सदस्यांसाठी सुरू केलेल्या वेब पोर्टलवर ही सेवा येत्या १६ आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे.‘युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) मेंबर्स पोर्टल’ असे या पोर्टलचे नाव असून त्यावर सदस्यांना आपला मालक प्रॉव्हिडन्ट फंडाची रक्कम दर महिन्याला वेळच्या वेळी खात्यात जमा करतो आहे की नाही, याची माहिती वेळच्या वेळी पाहता येईल. या नव्या पोर्टलचे उद््घाटन १६ आॅक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, असे सांगून ‘ईपीएफओ’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही सेवा सुरू झाल्यावर सदस्य आपल्या खात्याची खतावणी स्वत: उघडून पाहू शकेल व आयुष्यात कुठेही नोकरी केली तरी त्याचे तेच खाते कायम राहील. ‘यूएएन’ नंबर ‘पोर्टेबल’ असल्याने सदस्य कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, तरी त्याचे खाते नव्या ठिकाणीही पूर्वीच्याच नंबरने सुरू राहील.याच दिशेने सदस्यांना अधिक मूल्यवर्धित सेवाही पुरविल्या जातील. सेवानिवृत्तीनंतर फंडाचे पैसे अदा करणे आणि वयाला ५८ वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शन सुरू करणे अशी कामे कोणतेही कागदी घडे न वाचविता करणे त्यामुळे शक्य होईल. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सदस्यांना दिलेले चार कोटींहून अधिक ‘यूएएन’ नंबर त्यांच्या खात्याशी संलग्न करण्याचे काम ठरल्या कार्यक्रमानुसार प्रगतिपथावर असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.‘यूएएन’ नंबरवर आधारित सेवा अधिक कार्यक्षम होण्यासाठी सदस्याच्या बँक खात्याचा नंबर त्याच्या ‘पोर्टेबल’ पीएफ खात्याशी संलग्न होणे गरजेचे आहे. याचसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बँक खात्याचा क्रमांक व आयएफएससी कोड पुरविणे ‘ईपीएफओ’ने सर्व मालकांना सक्तीचे केले आहे. यासाठी मालकांना १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली गेली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)(लोकमत न्यूज नेटवर्क)—————————————निम्म्या सदस्यांची माहिती मिळाली‘ईपीएफओ’च्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या ताज्या माहितीनुसार देशभरातील ४.३ लाख खासगी कंपन्या आणि आस्थापनांमध्ये नोकरी करणारे ४.१८ कोटी कामगार- कर्मचारी प्रॉव्हिडन्ट फंडाचे सदस्य आहेत. त्यांच्यापैकी २.०४ सदस्यांच्या बँक खात्यांचा तपशील, ९२.९४ लाख सदस्यांचे ‘पॅन’ नंबर आणि ३५.४ लाख सदस्यांचे ‘आधार’ क्रमांक संघटनेकडे उपलब्ध आहेत.————————————-