मुंबई : केंद्र सरकारने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे हे लक्ष्य निर्धारित केले आहे. परंतु, त्या अनुषंगाने गृहनिर्माणाला चालना देणेही गरजेचे आहे. गृहनिर्माण प्रकल्पांना ज्या परवानग्या आवश्यक आहेत, त्या प्राप्त करण्यासाठी सध्या एक वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. मात्र, या कालावधीत कपात करत ६० ते ९० दिवसांत परवानग्या देण्यासाठी 'सिंगल विन्डो' प्रणाली विकसित करण्याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत महिन्द्रा लाईफस्पेस डेव्हलपर्सच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता अर्जुनदास यांनी व्यक्त केले. कंपनीने मुंबईनजीकच्या बोईसर येथे परवडणाऱ्या दरातील गृहनिर्माण प्रकल्पाची गुरुवारी घोषणा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अनिता अर्जुनदास म्हणाल्या की, सध्या देशात निवासव्यवस्थेचा मोठा प्रश्न आहे. विशेषत: मोठ्या शहरांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत सामान्यांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीवर भर देण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने कंपनीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. १४ एकरमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार असून सुमारे वन रुम किचन, वन बीएचके आणि टू-बीएचके अशा एकूण ८०० घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. केवळ घरेच नव्हे तर तेथील लोकांच्या दैनंदिन गरजांच्या अनुषंगानेही सर्व पायाभूत सुविधा या प्रकल्पांत साकारण्यात येतील,असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
रियल इस्टेट उद्योगाला हवी सिंगल विंडो प्रणाली
By admin | Updated: October 10, 2014 03:49 IST