Join us

RBI Monetary Policy Home Loan: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; ५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सर्वसामान्यांना दिलासा, कर्जाचे व्याजदर कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 10:10 IST

RBI Monetary Policy Home Loan: रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरासंदर्भात मोठी घोषणा केली. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर ०.२५ टक्क्यांनी म्हणजेच २५ बेसिस पॉईंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली.

RBI Monetary Policy Home Loan: रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरासंदर्भात मोठी घोषणा केली. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर ०.२५ टक्क्यांनी म्हणजेच २५ बेसिस पॉईंट्सनं कमी करण्याचा (rbi monetary policy rate cut) निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर (RBI Governor) संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक पार पडली. या बैठकीत रेपो दरासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज पार पडली. या बैठकीत रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सनं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यानंतर रेपो दर ६.२५ टक्क्यांवर आलाय. पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वीच अनेक तज्ज्ञांनी रेपो दर यावेळी कमी केले जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला होता. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर आता कर्ज घेणाऱ्यांना आणि ज्यांचं आता गृहकर्ज सुरू आहे अशा ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यावेळी माहिती देताना गव्हर्नरांनी महागाई दर हे लक्ष्याच्या जवळ आल्याचं म्हटलंय. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये जीडीपी ग्रोथ ६.७ टक्के राहू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.  

२०२३ पासून रेपो दर कायम

फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. यापूर्वी २०२० मध्ये करोना महामारीच्या काळात रेपो दर कमी करण्यात आला होता, परंतु त्यानंतर हळूहळू तो ६.५० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. व्याजदरात कपातीच्या घोषणेनंतर गृहकर्ज, कार लोन, पर्सनल लोनच्या ईएमआयमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. 

किती कमी होईल ईएमआय?

जर एखाद्यानं २० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतलं असेल आणि कर्जाचं व्याज ८.५ टक्के असेल. या योजनेचा कालावधी २० वर्षांचा असला तर सध्याचा ईएमआय १७,३५६ रुपये असणार आहे. परंतु आरबीआयने व्याजदरात आता २५ बेसिस पॉईंट्स किंवा ०.२५ टक्क्यांची कपात केल्यानंतर कर्जाचा व्याजदर ८.२५ टक्के होईल. या आधारावर त्यांना २० लाखांच्या कर्जावर १७,०४१ रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच दरमहा ३१५ रुपयांची बचत होईल.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक