नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज व्याजदर कपातीच्या बाजूने आपले मत दिले. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक आगामी पतधोरणात व्याजदरात कपात करील व भांडवल अधिक स्वस्त करण्याच्या दिशेने पाऊल उचलेल असे जेटली यांनी म्हटले आहे. भांडवलाची किंमत परवडण्यासारखी असली पाहिजे. अर्थव्यवस्था खुली करायची असेल तर बाजारात पैसा खेळता पाहिजे, भांडवल स्वस्त दरात असले पाहिजे. तरच खुल्या अर्थव्यवस्थेचे लाभ मिळू शकतील असे जेटली म्हणाले. ही साखळी आहे, या घटना अशाच घडल्या पाहिजेत असे वृत्तसंस्थेच्या पत्रकारांशी बोलताना जेटली म्हणाले. रिझर्व्ह बँकेने गेल्या १० महिन्यांपासून व्याजदर बदललेले नाहीत. व्याजदर कपातीची मागणी उद्योग व सरकारकडून केली जात असतानाही महागाईचे कारण दाखवून व्याजदर चढे ठेवले जात आहेत; पण आता अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा निर्णय घेतला जाणे भाग आहे. येत्या २ डिसेंबर रोजी रिझर्व्ह बँक द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रिझर्व्ह बँकेने भांडवल स्वस्त करावे -जेटली
By admin | Updated: November 24, 2014 01:49 IST