Join us

RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

By जयदीप दाभोळकर | Updated: April 22, 2025 09:37 IST

RBI Minor Account Rule: लहान मुलांमध्ये आर्थिक जागरुकता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) अल्पवयीन मुलांसाठी नवीन बँक खातं नियम २०२५ जारी केले आहेत.

RBI Minor Account Rule: लहान मुलांमध्ये आर्थिक जागरुकता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) अल्पवयीन मुलांसाठी नवीन बँक खातं नियम २०२५ जारी केले आहेत. आता १० वर्षांवरील मुलंही स्वतंत्रपणे आपले बँक खातं ऑपरेट करू शकणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे नवे नियम १ जुलै २०२५ पासून लागू होतील. मुलांसाठी बँक खात्याचे नवे नियम काय आहेत, ही खाती कशी उघडायची, अटी व शर्ती काय आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

रिझर्व्ह बँकेनं (RBI) १० वर्षांवरील मुलांच्या बँक खात्यांशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. हे आहेत आरबीआयचे नवे नियम-

  • आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, १० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची अल्पवयीन मुलं स्वतंत्रपणे आपलं बचत किंवा मुदत ठेव खातं उघडू आणि ऑपरेट करू शकतात.
  • १० वर्षांखालील मुलांच्या बँक खात्याचे नियम बदललेले नाहीत. त्यांचं बँक खातं पालक किंवा कायदेशीर पालक खातं उघडू शकतात.
  • अल्पवयीन मुलाचं बँक खातं उघडण्यासाठी मूल आणि पालक या दोघांचंही आधार, जन्माचा दाखला आदी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे.
  • आरबीआयच्या नव्या नियमानुसार १० वर्षांवरील मुलांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाणार नाही. परंतु बँका आपल्या धोरणानुसार मुलांना एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग सारख्या सुविधा देऊ शकतात. 

मुलांचं बँक खातं कसं उघडाल?

  • सर्वप्रथम बँकेची निवड करा आणि बँकांमध्ये मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधांची तुलना करा. 
  • मुलांचं बँक खातं उघडण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे गोळा करा. जसं की मुलाचं आधार कार्ड, जन्म दाखला, पालकांचं केवायसी दस्तऐवज इत्यादी.
  • तुम्ही मुलांचं बँक खातं ऑनलाइन किंवा ऑफलाइन उघडू शकता.
  • केवायसी व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. पालकांची इच्छा असेल तर ते मुलांसाठी व्यवहाराची मर्यादा ठरवू शकतात. 

अटी आणि शर्ती काय?

  • मुलांना काही बँकांमध्ये जास्तीत जास्त १,००,००० रुपये शिल्लक आणि किमान १०,००० रुपये शिल्लक ठेवणं आवश्यक आहे. या खात्यांमध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध नाही.
  • मूल १८ वर्षांचं झाल्यावर केवायसी अपडेट आणि स्वाक्षरी अनिवार्य आहे.
  • पालक नियमितपणे अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवू शकतात. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी पैसे काढण्याची मर्यादा ठरवू शकतात.
  • मुलांना सुरक्षित बँकिंगचे नियम शिकवले पाहिजेत. पिन किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका.
टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक