Join us  

पतधोरणात व्याजदर कायम; अधिक सवलतींचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 2:25 AM

अर्थव्यवस्था ९.५ टक्के कमी होण्याचा अंदाज

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी काळात अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाण्यासाठी काही प्रमाणात सवलती दिल्या जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ९.५ टक्के एवढी घटण्याची शक्यताही यावेळी व्यक्त करण्यात आली.बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक सुरू होती. या बैठकीत नव्यानेच नियुक्त केलेल्या तीन सदस्यांसह सर्व सदस्य उपस्थित होते. या सदस्यांनी एकमताने रेपो आणि रिव्हर्स रेपो हे दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये ११५ अंशांची म्हणजेच १.१५ टक्क्यांनी घट केली आहे. आॅगस्ट महिन्यात जाहीर झालेल्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरामध्ये कपात करण्यास बँकेने नकार दिला होता. यावेळीही तेच धोरण पुढे सुरू राहिले आहे.बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, एप्रिल ते जून या तिमाहीतील आर्थिक विकासाचा दर २३.९ टक्के असा प्रचंड घसरला आहे. मात्र अर्थव्यवस्था हळूहळू वेग घेऊ लागली असून, त्यामध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेचा विकासदर चांगला होण्याची अपेक्षाही दास यांनी व्यक्त केली आहे.देशात अन्न धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असून, ते विक्रमी झाले आहे. त्याचप्रमाणे औद्योगिक उत्पादनातही वाढ होऊ लागली आहे. परिणामी अर्थव्यवस्था विकासाकडे वाटचाल करू लागल्याचे दास यांनी स्पष्ट केले.चालू आर्थिक वर्षात कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेवटच्या तिमाहीत अर्थव्यवस्था वाढणार असली तरी अर्थव्यवस्था घटण्याचा दर ९.५ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज दास यांनी व्यक्त केला आहे.डिसेंबरपासून आरटीजीएस होणार २४ तासयेत्या डिसेंबर महिन्यापासून बँकांमधून रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या आरटीजीएस सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. सध्या ही सुविधा बँकांच्या कार्यालयीन वेळामध्येच उपलब्ध असून, २ लाख रुपये वा त्यापेक्षा अधिक रक्कम वर्ग करण्यासाठी तिचा वापर केला जातो.गेल्या डिसेंबर महिन्यापासून एनईएफटी ही सुविधा वर्षाचे ३६५ दिवस आणि २४ तास उपलब्ध करून दिली आहे. त्यापाठोपाठ आरटीजीएसही ग्राहकांंना २४ तास उपलब्ध होणार असल्याने मोठी सुविधा होणार असल्याचे दास यांनी सांगितले...या आहेत महत्त्वाच्या घोषणारेपो रेट ४ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवर कायम.निवासी मालमत्तांच्या किमतीच्या ८० टक्क्यांपर्यंतच्या कर्जावर बँकांसाठी ३५ टक्के जोखमीच्या आधारे भांडवलाची तरतूद करणे बंधनकारक.चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत महागाईच्या वाढीचा दर ४ टक्क्यांपर्यंत येण्याचा बँकेचा अंदाज.सध्या देशात वाढलेली महागाई ही विस्कळीत झालेली पुरवठ्याची साखळी आणि वाढलेली मागणी यामुळे असल्याचे दास यांचे प्रतिपादन.खुल्या बाजारातून सरकारी रोखे विकत घेण्यासाठी अर्थव्यवस्थेत २० हजार कोटी आणण्याची घोषणा.रिटेल आणि एसएमई या क्षेत्रांना अधिक कर्जपुरवठा व्हावा यासाठी भांडवली मर्यादा ५ कोटी वरून ७.५ कोटी वाढविण्याचा निर्णय.निर्यातदारांना कोरोनाच्या साथीचा मोठा फटका बसला असल्याने त्यांच्यासाठीही काही योजना आणल्या जातील.अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी आगामी काळात आवश्यक ते सर्व उपाय बँकेतर्फे योजले जातील.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक