Join us  

मुलाने संपत्तीतून बेदखल केल्यानंतर विजयपत सिंघानियांचा सर्व पालकांसाठी भावनिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 3:00 PM

'तुमच्या मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. पण तुम्ही त्यांच्या प्रेमात आंधळे व्हाल असं प्रेम करु नका'

मुंबई, दि. 15 - देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहापैकी एक असलेल्या ‘रेमंड’ची धुरा पुत्र गौतम सिंघानिया यांच्याकडे सोपविल्यानंतर कथित अडचणींना तोंड देत असलेले ज्येष्ठ उद्योगपती विजयपत सिंघानिया यांनी सर्व पालकांना एक भावनिक संदेश दिला आहे. 'तुमच्या मुलांवर प्रेम करा, त्यांची काळजी घ्या. पण तुम्ही त्यांच्या प्रेमात आंधळे व्हाल असं प्रेम करु नका', असा संदेश विजयपत सिंघानिय यांनी दिला आहे. 

याआधी बोलताना विजयपत सिंघानिया यांनी संपूर्ण संपत्ती आणि कंपनी मुलाकडे सोपवून कदाचित चूक झाली असावी, अशी भावना व्यक्त केली होती. मात्र, त्याचवेळी गंभीर आर्थिक संकटाला तोंड देत असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांकडून दिल्या जात असलेल्या बातम्या पूर्णत: निराधार आहेत. माझी आर्थिक परिस्थिती कधीही वाईट नव्हती. ईश्वराच्या कृपेमुळे कधीही वाईट होणार नाही. गौतमने मनात येईल ते केले तरी तो माझे काहीही बिघडवू शकत नाही असंही विजयपत सिंघानिया बोलले होते. 

8 फेब्रुवारी 2015 रोजी विजयपत सिंघानिया यांनी 1000 कोटींचे सर्व शेअर्स आपला मुलगा गौतम सिंघानियाच्या नावे केले होते. आता याची किंमत 6000 कोटी झाली आहे. 'माझा संपत्तीवर पूर्ण अधिकार असल्यामुळेच मी उच्च न्यायालयात पुत्राविरुद्ध लढत आहे. मी आणि गौतमने संपत्तीबाबत करार केला होता. आता गौतम त्या करारापासून दूर गेला आहे. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी मी माझी सर्व कमाई गौतमकडे सोपविली. मात्र त्यानंतर मी जसा विचार केला त्याप्रमाणे गौतम राहिला नव्हता. मी संपूर्ण कंपनी त्याच्याकडे सोपवून कदाचित चूक केली असावी', असे विजयपत सिंघानिया यांनी म्हटले आहे. 

'माझ्याकडचं सगळं दिल्यानंतर कौटुंबिक वाद न्यायालयात न्यावा लागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या डोक्यावर छतंही नसेल याची कल्पना नव्हती', असं विजयपत सिंघानिया यांनी सांगितलं. 

हा पूर्ण वाद जेके हाऊसबाबत आहे. ही बिल्डिंग १९६० मध्ये बांधली गेली. तेव्हा ती १४ माळ्यांची होती. नंतर या बिल्डिंगचे चार ड्युप्लेक्स रेमंडची शाखा असलेल्या पश्मिना होल्डिंग्सला दिले गेले. त्यांच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, सिंघानिया यांनी कंपनीतील आपले शेअर मुलाला दिले होते. मीडियात येणाºया बातम्यांनुसार, या शेअर्सची किंमत सुमारे १००० कोटी रुपये इतकी होती. परंतु आता गौतम यांनी त्यांना निराधार सोडले असून त्यांच्याकडून गाडी व चालकही परत घेतले आहेत. मलबार हिल येथे त्यांचा स्वत:चा ३६ माळ्यांचा ड्युप्लेक्स जेके हाऊस आहे. परंतु येथे राहण्यासाठी त्यांना कायदेशीर लढाई लढावी लागत आहे.