Join us

रत्नागिरीत चार संशयित खलाशी ताब्यात

By admin | Updated: August 21, 2014 23:53 IST

- बेकायदा सिमकार्डचा वापर : गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई

- बेकायदा सिमकार्डचा वापर : गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
रत्नागिरी : मच्छिमारी नौकांवर काम करणार्‍या अनेक परदेशी खलाशांकडून बेकायदा मोबाईल सिमकार्ड वापर होत असल्याचे गंभीर प्रकरण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहे. गुरुवारी दुपारी मिरकरवाडा बंदरात छापा टाकून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. कागदपत्र तपासणीत चौघेजण संशयित सापडल्याने त्यांना पुढील चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले.
एकाचा गुन्हा साबित झाल्याने त्याच्यासह मोबाईल व सिमकार्ड विक्रेत्याला ताब्यात घेऊन दोघांवर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात मच्छिमारी नौकांवर खलाशी म्हणून काम करणारे अनेक खलाशी बेकायदेशीर मोबाईल सिमकार्डस वापरत असून त्यांच्याकडे ओळख पटविणारी आवश्यक कागदपत्रेही नसल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यावरून गुरुवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली.
चार संशयितांपैकी दलबहादूर रामफल चौधरी (४०, नेपाळ) याच्याकडे बोगस ओळखपत्र आणि बेकायदा मोबाईल सिमकार्ड सापडले. त्यासाठी त्याने विके्रत्याकडे कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती. हे सिमकार्ड त्याने नाटे बाजारपेठेतील विक्रेता दर्शन सुहास कुवेसकर याच्याकडून घेतले आहे. मात्र दर्शन कुवेसकर याच्याकडे सिमकार्ड व मोबाईल विक्रीचा कोणताही परवाना नाही, अशी माहिती लगेचच पुढे आली. त्याने कोणतीही कागदपत्रे न घेता हा व्यवहार केल्याने त्यालाही नाटे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील आणखी तीन संशयितांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडील सिम, ओळखपत्रप्रकरणी तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)