Join us  

तेजीचा संचार सुरूच; सेन्सेक्स पोहोचला ४९ हजारांपुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 2:17 AM

खरेदीचा उत्साह : निफ्टीनेही गाठला नवा उच्चांक; मिडकॅप, स्माॅल कॅपमध्ये किरकोळ घट

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बाजारात असलेली गुंतवणूकदारांची मोठी उपस्थिती, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली आक्रमक खरेदी यामुळे शेअर बाजारातील तेजी कायम आहे. या तेजीच्या बळावरच बाजाराच्या संवेदनशील तसेच निफ्टी या निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. त्याचबरोबर सेन्सेक्स प्रथमच ४९ हजारी बनला असून, आता गुंतवणूकदारांना तो ५० हजारांचा जादुई आकडा गाठण्याची प्रतीक्षा आहे. सोमवारची सुरुवात मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ४९ हजारांचा टप्पा ओलांडत केली. त्यानंतर तो वर-खाली होत ४९,३०३.७९ अंशांपर्यंत पोहोचला. मात्र बाजार बंद होताना तो काहीसा खाली आला. दिवसअखेर हा निर्देशांक ४८६.८१ अंशांनी वाढून ४९,२६९.३२ अंशांवर बंद झाला. 

राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही तेजीची स्थिती होती. येथील अधिक व्यापक पायावर आधारित असलेल्या निफ्टी या  निर्देशांकाने १४,४९८.२० अशी उच्चांकी पातळी गाठली. त्यानंतर बाजार बंद होताना हा निर्देशांक काहीसा खाली म्हणजे १४,४८४.७५ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये १३७.५० अंशांनी वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्माॅलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मात्र किरकोळ घट झाली आहे. अनेक क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झालेली दिसून आली.

पन्नास हजारांकडे लक्षदेशभरामध्ये लवकरच सुरू होणारे कोविड लसीकरण, कंपन्यांचे येत असलेले चांगले तिमाही निकाल, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली मोठी गुंतवणूक यामुळे बाजार जोरदारपणे वाढत आहे. आगामी काळामध्येही वातावरण सकारात्मक राहण्याची अपेक्षा असल्याने लवकरच सेन्सेक्स ५० हजारी बनण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

टॅग्स :व्यवसायकोरोना वायरस बातम्या