Join us  

राकेश झुनझुवाला व राधाकिशन दमानी ‘या’ बँकेचा १० टक्के हिस्सा खरेदी करणार; RBI शी मोठी डील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 2:04 PM

RBI राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांच्या ऑफरवर विचार करत असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. यातच आता शेअर बाजारातील बिग बूल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला आणि त्यांचेच गुरु राधाकिशन दमानी यांनी एका बँकेतील १० टक्के हिस्सा खरेदी करण्याचा मानस दर्शवला आहे. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI शी चर्चा सुरू असून, ही मोठी डील होऊ शकते, असे सांगितले जात आहे. 

देशातील आघाडीचे आणि प्रचंड मोठे गुंतवणूकदार म्हणून राकेश झुनझुनवाला आणि डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्याकडे पाहिले जाते. बँकिंग क्षेत्रातील एक मोठी डील म्हणून सर्वांचे लक्ष लागले आहे. राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांनी या बँकेतील १० टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडे संपर्क साधला आहे.

७८ वर्ष जुन्या बँकेतील हिस्सा खरेदी करणार

RBI ने ख्रिसमसच्या दिवशी मुंबईच्या ७८ वर्ष जुन्या RBL बँकेत बदल केले होते. RBI चे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांना खाजगी बँकेच्या मंडळावर अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. झुनझुनवाला आणि दमानी यांनी RBL बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई करण्यापूर्वी विनंती केली होती. आरबीएल  बँकेतील १० टक्के हिस्सा खरेदीबाबत आरबीआय सध्या झुनझुनवाला आणि दमानी यांच्या विनंतीवर विचार करत आहे. आरबीएलने बँकेचे एमडी आणि सीईओ विश्ववीर आहुजा यांना तात्काळ रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी कार्यकारी संचालक राजीव आहुजा यांना हंगामी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनवण्यात आले आहे.

डिसेंबरच्या तिमाहीत बँकेचा नफा जास्त असेल

बँकेच्या आर्थिक स्थितीबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत राजीव आहुजा यांनी सांगितले की, डिसेंबरच्या तिमाहीत बँकेचा नफा सप्टेंबरच्या तिमाहीपेक्षा जास्त असेल. RBL बँक आणि तिच्या धोरणाला केंद्रीय बँकेचा पूर्ण पाठिंबा आहे. विश्ववीर आहुजा यांनी वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा दिला आहे. असे सांगत राजीव आहुजा यांनी यावर अधिक बोलणे टाळले. विश्ववीर यांचा कार्यकाळ सहा महिने शिल्लक होता. 

दरम्यान, आम्हाला सेवा, प्रशासन, डिजिटल आणि जोखीम-प्रतिरोधी क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. बँकेकडे १५ हजार कोटी रुपयांची अधिक तरलता आहे. आणि बँक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पावले उचलत आहे. मार्च २०२२ पर्यंत बँक आपला निव्वळ एनपीए २ टक्क्यांच्या खाली आणेल, असे आहुजा यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकराकेश झुनझुनवाला