नवी दिल्ली : नव्याने स्थापन होत असलेल्या ब्रिक्स देशांच्या विकास बँकेचा पहिला अध्यक्ष भारतीय असणार आहे. या पदासाठी काही नावांची एक यादी तयार करण्यात आली असून, त्यात रिझर्व्ह बँकेचे प्रमुख रघुराम राजन यांच्या नावाचा समावेश आहे. अर्थमंत्रालयाशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, रघुराम राजन यांच्या नावावर चर्चाही झाली आहे. तथापि, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राजन यांच्या शिवाय एक केंद्रीय मंत्री, पायाभूत क्षेत्रात काम करणाऱ्या एका बँकेचा प्रमुख अशी काही नावे यादीत आहेत. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आणखी काही नावांचा विचार व्हायला हवा, असे मोदी सरकारला वाटते. शनिवारी ब्रिस्बेन येथे सुरू झालेल्या ब्रिक्स देशांच्या बैठकीच्या शुभारंभाच्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, ब्रिक्सबँकेचे उद्घाटन २0१६ साली झाले पाहिजे, असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या वर्षाच्या अखेरीस यासंबंधीच्या कराराला मंजुरी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. बँकेच्या अध्यक्षपदासाठी आमचा उमेदवार आम्ही लवकरच घोषित करू. ब्रिक्स देशांच्या गटात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि द. आफ्रिका यांचा समावेश आहे. फोर्टलेझा येथे झालेल्या ब्रिक्सच्या सहाव्या शिखर परिषदेत बँकेचा पहिला अध्यक्ष भारतीय असेल, तसेच बँकेचे मुख्यालय चीनमध्ये असेल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्या दृष्टीने मोदी सरकार बँकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार शोधत आहे. या पदासाठी राजन यांचे नाव अंतिम झाले नसले तरी त्यांना डावलणे सरकारला अवघड जाईल, असे अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यास वाटते. रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारून १४ महिने झाले आहेत. या काळात रुपयाची अस्थिरता संपली आहे. विदेशी खाते स्थिर झाले आहे.
ब्रिक्स बँकेच्या प्रमुखपदासाठी राजन आघाडीवर
By admin | Updated: November 18, 2014 00:05 IST