Join us
Daily Top 2Weekly Top 5

राजन यांच्याविरोधात अवाक्षरही उच्चारले नाही

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आपण कोणतेही आव्हान दिले नसल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिले.

नवी दिल्ली : व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना आपण कोणतेही आव्हान दिले नसल्याचे स्पष्टीकरण अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी दिले. भारताच्या उत्पादन क्षमता वाढीसाठी आपण निव्वळ सूचना केल्या होत्या, असा दावाही जेटली यांनी केला.‘मेक इन इंडिया’ मोहिमेसंदर्भात सोमवारी राजधानी दिल्लीत एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केलेल्या भाषणासंदर्भात प्रसारमाध्यमांत आलेल्या उलटसुलट बातम्यांनंतर जेटली यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. माध्यमांनी आपल्या भाषणाचा विपर्यास केल्याचा आरोपही त्यांनी केला.फेसबुक पोस्टद्वारे जेटली यांनी स्पष्ट केले की, ‘माझ्या कालच्या भाषणात रिझर्व्ह बँक वा तिचे गव्हर्नर यांच्याविरोधात एक ओळ किंवा शब्दही नव्हता.’ तथापि, अर्थमंत्र्यांच्या या भाषणाकडे राजन यांच्यावरील टीका म्हणून पाहिले गेले. जेटलींनी आपल्या भाषणात, निर्यातीत आलेल्या मंदीमागे व्याजाचे अधिक दर हे एक कारण असल्याचे म्हटले होते. जेटली पुढे म्हणाले, ‘मी न दिलेल्या भाषणाची बातमी प्रसिद्ध झाली. रिझर्व्ह बँक वा तिचे गव्हर्नर यांना उद्देशून मी बोललो असल्याचा दावा बातमीत करण्यात आला आहे.’ उत्पादन प्रक्रियेस चालना देण्यासाठी जेटली यांनी विविध उपाययोजना सुचविल्या. यावेळी जेटलींनी व्याजदर कपातीची गरज प्रतिपादित केली होती. भारताला उत्पादन केंद्र म्हणून रूपांतरित करण्यासंदर्भात जो कुणी बोलत असेल त्याला तो ही शिफारस नक्की करील, असा दावाही जेटली यांनी या पोस्टमध्ये केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)४माध्यमांनी आपल्या भाषणाचा विपर्यास केल्याचा आरोपही जेटली यांनी केला.४‘पत्रकारितेच्या जगात प्रचंड स्पर्धा सुरू आहे. पत्रकार नेहमीच एका नव्या तथ्याच्या शोधात असतात.४काही घडले नसतानाही भाषणात मोडतोड करून त्यास नवे वळण देण्याचा प्रयत्न केला जातो,’ असा दावा जेटली यांनी केला.