Join us

रेल्वे अर्थसंकल्पाने शेअर बाजार निराश

By admin | Updated: February 26, 2016 03:19 IST

रेल्वे अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात निराशा पसरली आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या घसरणीचा कल सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११३ अंकांनी

मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात निराशा पसरली आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या घसरणीचा कल सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११३ अंकांनी घसरून २३ हजार अंकांच्या खाली आला. फेब्रुवारीमधील डेरिव्हेटिव्ह सौद्यांची समाप्ती तसेच आशियाई बाजारातील नरमाई याचाही परिणाम बाजारात दिसून आला. याशिवाय रुपयाच्या घसरणीचाही फटका बाजाराला बसल्याचे ब्रोकरांनी सांगितले.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर रेल्वे अर्थसंकल्प जाहीर होताच तो घसरणीला लागला. सत्राच्या अखेरीस २२,९७६ अंकांवर बंद झाला. ११२.९३ अंकांची अथवा 0.४९ टक्क्यांची घसरण त्याने नोंदविली. त्याआधीच्या दोन दिवसांत सेन्सेक्सने ७00 अंक गमावले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७ हजार अंकांच्या खाली आला आहे. ४८.१0 अंकांची अथवा 0.६९ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ६,९७0.६0 अंकांवर बंद झाला. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरले. कालिंदी रेल निर्माणचे समभाग ९.२६ टक्क्यांनी, टेक्समॅको रेलचे समभाग ८.७८ टक्के, टिटागढ वॅगन्सचे समभाग ८.४0 टक्के, सिम्प्लेक्स कास्टिंग्जचे समभाग ८.१६ टक्के, स्टोन इंडियाचे समभाग ५.७४ टक्के आणि बीईएमएलचे समभाग ४.0६ टक्के घसरले.