Join us

रेल्वेच्या २ एफडीआय प्रकल्पांना दिली मंजुरी

By admin | Updated: March 8, 2015 23:32 IST

बिहारमध्ये २४०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिन (लोकोमोटिव्ह) प्रकल्पांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय)

नवी दिल्ली : बिहारमध्ये २४०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिन (लोकोमोटिव्ह) प्रकल्पांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) हिरवी झेंडी दाखवत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ मोहीम प्रत्यक्षात आणण्याकडे ठोस पाऊल टाकले आहे.मधेपुरा इलेक्ट्रिक इंजिन आणि मरहोडा डिझेल रेल्वे इंजिन प्रकल्प संयुक्त विद्यमाने उभारले जाणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे.हा प्रकल्प प्रदीर्घ काळापासून लांबणीवर पडला. अनेकदा निविदा मागविण्यात आल्यानंतर फेरविचार झाला होता. प्रभू यांनी आता त्यासंबंधी अनिश्चितता संपुष्टात आणली आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी रिक्विेस्ट फॉर प्रपोजल (आरपीएफ) तयार करण्यात आले असून निविदा प्रक्रियांची छाननी करण्यात आली आहे, असे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अल्सटॉम, सिमेन्स, जीई आणि बम्बार्डियर या चार जागतिक कंपन्या, तर मरडोहा डिझेल इंजिन कारखान्यासाठी जीई आणि ईएमडी या दोन बहुराष्ट्रीय कंपन्या स्पर्धेत उरल्या आहेत. या दोन कारखान्यांसाठी अंदाजे खर्च प्रत्येकी १२०० कोटी रुपये अपेक्षित आहे. निविदा ३१ आॅगस्ट रोजी उघडल्या जातील. त्याआधी दोन बैठकी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)