Join us

जॉन यांना राहुल गांधींचे पाठबळ

By admin | Updated: August 28, 2014 23:09 IST

कारवाई चालूच राहील : आज राहुल गांधींना भेटणार

कारवाई चालूच राहील : आज राहुल गांधींना भेटणार
पणजी : पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांवर कारवाई चालूच राहील, असे स्पष्ट करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी आपल्या या धडक कृतीला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचेही सर्मथन असल्याचा दावा केला आहे. जॉन शुक्रवारी सकाळी राहुल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गोव्यातील पक्ष कारभाराबाबत भाष्य करणार आहेत. त्यानंतर ते पक्ष प्रभारी दिग्विजय सिंह यांचीही पुन्हा भेट घेणार आहेत.
जॉन हे सध्या दिल्लीतच ठाण मांडून आहेत. या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, नव्या गट समित्या स्थापन करण्याचे काम चतुर्थीनंतर सुरू होईल. या समित्या यापुढे आमदारांच्या नव्हे तर पक्षाच्या नियंत्रणात राहतील, अशी व्यवस्था असेल. पक्षबांधणीच्या बाबतीत आपण वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत, त्या आत्ताच उघड करता येणार नसल्याचे ते म्हणाले.
पक्षाशी द्रोह करणार्‍यांविरुद्ध कारवाईच्या बाबतीत आपल्याला पक्ष प्रभारी दिग्विजय सिंह यांनी मोकळीक दिली आहे. पक्ष स्वच्छ करण्यासाठीच त्यांनी आपल्याला आणलेले आहे, असे जॉन म्हणाले. शिस्तभंग समितीचा अध्यक्ष या नात्याने पक्षर्शेष्ठींना आपण याआधी अहवाल सादर केलेला आहे; परंतु पक्ष प्रभारी केवळ आपल्या अहवालावरच अवलंबून नाहीत. गोव्यात पक्षनेते, आजी, माजी आमदार तसेच आजी, माजी खासदारांच्या कोणत्या कारवाया चालतात, याबाबत अन्य माध्यमांतूनही र्शेष्ठींना माहिती मिळते, असे ते म्हणाले. आपल्या कारवाईत कोणताही खंड पडणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. (प्रतिनिधी)
......चौकट.....
गट समित्यांमध्ये यापुढे आमदारांना र्मयादित स्थान
विद्यमान किंवा माजी आमदारांना गट समित्यांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा अधिक प्रतिनिधित्व दिले जाणार नाही. लोकसभा निवडणुकीत माविन, सार्दिन, वालंका यांच्या बाबतीत वाईट अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे गटसमित्या बरखास्त कराव्या लागल्या. वास्तविक लोकसभा निवडणुकीच्याचवेळी आपण त्या बरखास्त करणार होतो, असे जॉन म्हणाले.