Join us
Daily Top 2Weekly Top 5

रबीच्या पिकांना गारपिटीचा धोका !

By admin | Updated: November 16, 2015 00:07 IST

पश्चिमेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह एल निनोमुळे मध्य भारतातून वाहण्याची शक्यता असून, तसे झाल्यास महाराष्ट्रासह मध्य भारताला पुन्हा गारपिटीचा फटका बसू शकतो

अकोला : पश्चिमेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह एल निनोमुळे मध्य भारतातून वाहण्याची शक्यता असून, तसे झाल्यास महाराष्ट्रासह मध्य भारताला पुन्हा गारपिटीचा फटका बसू शकतो, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीला कारणीभूत ठरलेला ‘एल निनो’ हा घटक येत्या दोन महिन्यांत त्याच्या सर्वोच्च पातळीवर पोचणार असल्याचा अंदाज ‘अमेरिकेच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने (सीपीसी) दिला आहे. त्याचबरोबर येत्या फेब्रुवारीपासून त्याची तीव्रता झपाट्याने कमी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतासाठी हा अंदाज मोठा दिलासा देणारा असू शकतो. पुढील वर्षांचा मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता यामुळे बळावली असली, तरी याबाबतचे निश्चित भाकीत २५ डिसेंबरनंतरच करता येईल, असे साबळे यांनी सांगितले. ‘सीपीसी’तर्फे दर महिन्याला एल निनोच्या स्थितीचा अहवाल आणि पुढील काळातील स्थितीचा अंदाज वर्तवण्यात येतो. गेल्या वर्षापासून प्रथमच प्रशांत महासागराचे तापमान कमी होण्याचा अंदाज अमेरिकेच्या या संस्थेने वर्तवला आहे. जगभरातील सतरा गतिमान प्रारूप (डायनॅमिक मॉडेल) आणि आठ सांख्यिकी प्रारूप (स्टॅटिस्टिकल मॉडेल) यांचा आधार घेऊन हा अंदाज वर्तवण्यात येतो. एप्रिल २०१५ मध्ये सीपीसीने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या मान्सूनवर संपूर्ण हंगामात ‘एल निनो’चे सावट राहण्याची शक्यता होती. हा अंदाज खरा ठरला असून, महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.