Join us

शिलकी साठ्यासाठी केंद्राकडून १५ हजार टन डाळींची खरेदी

By admin | Updated: January 22, 2016 03:09 IST

बफर स्टॉक तयार करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १५ हजार टन डाळींची खरेदी केली आहे. केंद्रीय खाद्यमंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : बफर स्टॉक तयार करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १५ हजार टन डाळींची खरेदी केली आहे. केंद्रीय खाद्यमंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती गुरुवारी दिली. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीए) गेल्या महिन्यात डाळींचा १.५ लाख टन बफर स्टॉक करण्यास मंजुरी दिली होती. डाळींच्या किमती १८0 रुपये किलोवर गेल्यानंतर पुरवठा वाढविण्याच्या हेतूने हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाचा पाठपुरावा करताना सरकार मोठ्या प्रमाणात डाळींचा साठा करीत आहे. रामविलास पासरवान यांनी पत्रकारांना सांगितले की, डाळींचा मुद्दा आमच्यासाठी आव्हान बनून राहिला आहे. डाळींचा पुरवठा आणि मागणी यांच्यात मोठे अंतर आहे. मागणी प्रतिवर्षी वाढतच आहे. त्या तुलनेत डाळींचे उत्पादन मात्र वाढताना दिसत नाही. त्यामुळे डाळींचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून आतापर्यंत ५ हजार टन डाळ आयात करण्यात आली आहे. अतिरिक्त १0 हजार टन डाळींसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत. खाजगी व्यापाऱ्यांनी चालू आर्थिक वर्षात ४४ लाख टन डाळ आयात केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पासवान म्हणाले की, बफर स्टॉकसाठी सरकारने आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक येथील शेतकऱ्यांकडून थेट पातळीवर १५ हजार टन डाळ खरेदी केली आहे. २0१५-१६ च्या रबी सत्रातही डाळींची खरेदी केली जाईल. मूल्य स्थिरीकरण कोशाच्या माध्यमातून किमान समर्थन मूल्याच्या वर बाजार मूल्याने ही खरेदी केली जाईल.खरेदीसाठी भारतीय खाद्य निगम, नाफेड आणि एसएफएसी या संस्थांना सरकारने खरेदीच्या कामाला जुंपले आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षात डाळींचे देशांतर्गत उत्पादन २0 लाख टनांनी घटून १.७२ कोटी टनांवर आले. त्यामुळे डाळींच्या किमती वाढल्या आहेत. मान्सून कमजोर राहिल्यामुळे २0१५-१६ या वर्षातही डाळींचे उत्पादन घटण्याचीच शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डाळींचा बफर स्टॉक करणे सरकारला भाग पडले आहे.