Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बेकायदा संपत्ती, पैशांची माहिती ३० सप्टेंबरपर्यंत द्या’

By admin | Updated: July 21, 2015 00:11 IST

विदेशात ठेवलेल्या बेकायदा पैशांची माहिती येत्या ३० सप्टेंबरपर्यंत दिली नाही तर हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे आयकर विभागाने सोमवारी म्हटले.

नवी दिल्ली : विदेशात ठेवलेल्या बेकायदा पैशांची माहिती येत्या ३० सप्टेंबरपर्यंत दिली नाही तर हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे आयकर विभागाने सोमवारी म्हटले.विदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांची माहिती देण्याची एक संधी सरकारने दिली असून त्यानुसार काळ्या पैशांची माहिती देण्यासाठी ३ महिन्यांची मुदत दिली आहे. आयकर विभागाने या संदर्भात देशातील प्रमुख राष्ट्रीय दैनिकांमध्ये जाहिरात दिली आहे.जाहिरातीत म्हटले आहे की, जर आपल्याकडे बेकायदा संपत्ती असेल तर त्याची माहिती ३० सप्टेंबरच्या आधी द्या. ज्यांची विदेशातील बँकांमध्ये खाती आहेत त्यांची माहिती आयकर विभागाकडे आहे. त्यामुळे अशा लोकांनी त्यांच्या संपत्तीची, पैशांची माहिती एक खिडकी योजनेद्वारे द्यावी.३० सप्टेंबरपर्यंत बेकायदा पैशांची माहिती दिली न गेल्यास त्या व्यक्तीवर १२० टक्के दराने कर आकारून दंडही आकारला जाईल. याशिवाय त्याला १० वर्षांच्या तुरुंगवासाचीही शिक्षा व हवाला व्यवहार प्रतिबंधक (मनी लाँड्रिंग) कायद्यानुसार कारवाईही केली जाईल. संबंधित व्यक्ती बेकायदा पैशांची माहिती आयकर विभागाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) देऊ शकते किंवा राजधानी दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयात स्वत: येऊन देऊ शकते. (लोकमत न्यूज नेटवर्क)