Join us
Daily Top 2Weekly Top 5

साध्या मोबाईलवरून द्या बँकिंग सुविधा

By admin | Updated: December 29, 2015 02:36 IST

देशात बँकिंग सेवेचा विस्तार करण्यासाठी आणि वित्तीय सेवा तळागाळापर्यंत पोहोचवत त्या लोकांना अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोबाईल फोन हेच मुख्य साधन असू शकते

मुंबई : देशात बँकिंग सेवेचा विस्तार करण्यासाठी आणि वित्तीय सेवा तळागाळापर्यंत पोहोचवत त्या लोकांना अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोबाईल फोन हेच मुख्य साधन असू शकते व याकरिता बँकांनी साध्या मोबाईलच्या माध्यमातून बँकिंग सेवा देता येईल, अशी सेवा विकसित करण्याची गरज असल्याचे मत वित्तीय समायोजनासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वित्तीय समायोजनाचे धोरण व नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक दीपक मोहांती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सोमवारी अहवाल दिला असून भविष्यातील बँकिंग व्यवस्थेसंदर्भात अनेक महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. वित्तीय समायोजन धोरण म्हणजे, देशाच्या तळागाळापर्यंत किमान बँकिंग सेवा पोहोचविणे, लोकांची बँक खाती सुरू करून त्यांना अर्थचक्रात समाविष्ट करून घेणे. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे तसेच संबंधित व्यक्तीचे व्यवहार बँक खात्याद्वारे होतील अशी व्यवस्था निर्माण करणे. यामुळे लोकांच्या खात्यात होणाऱ्या वार्षिक उलाढालीच्या अंगाने त्यांची वित्तीय पत तयार करणे. ही पत तयार झाल्यास या लोकांना त्यांच्या विविध उपक्रमांसाठी कर्ज योजना मिळून त्यांचा विकास साधण्याचे असे हे धोरण आहे. कॉँग्रेसप्रणित संपुआ सरकारच्या काळात सुरू झालेल्या या धोरणाचा आता विस्तार होत असून आगामी काळात असलेल्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी रालोआ सरकारने ही समिती स्थापन केली होती. या समितीने आगामी पाच वर्षांचा आढावा घेत या शिफारसी केल्या आहेत. (प्रतिनिधी)देशातील बँक शाखांचे प्रमाण वाढलेएकीकडे जन-धन योजना आक्रमकपणे राबविण्यात येत असताना दुसरीकडे बँकांनी आपल्या शाखा विस्ताराकडेही लक्ष केंद्रत केले आहे.या समितीने देशातील बँकिंग उद्योगाचा अभ्यास करताना नवी माहिती पुढे आली आहे. ग्रामीण भागात विस्तारप्रति एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत देशात २०१० साली बँक शाखांचे प्रमाण हे ७.२ टक्के होते. या प्रमाणात वाढ होत २०१५ मध्ये हे प्रमाण आता ९.७ टक्के इतके झाले आहे. विशेष म्हणजे, शाखा विस्तार करताना शहरासोबतच ग्रामीण भागांतूनही शाखा विस्तार झाला आहे. तसेच, सरत्या वर्षात बँकांच्या बचत खात्यांच्या संख्येतही १०.९ टक्के वाढ झाली आहे.