Join us  

अदानी म्हणाले, "अभिमानाची बाब..," 'या' कंपनीनं रचला इतिहास, ₹१८७८ वर आला शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 3:53 PM

जाणून घ्या कोणती आहे ही कंपनी आणि काय म्हणाले गौतम अदानी.

Adani Green Energy: अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडनं (AGEL) गुजरातमधील खावडा सोलर पार्कमध्ये 2,000 मेगावॅटची सौर क्षमता स्थापित केली आहे, जी 10,000 मेगावॅटहून अधिक रिन्युएबल एनर्जी क्षमता असलेली भारतातील पहिली कंपनी बनली आहे. दरम्यान, बुधवारी कामकाजाच्या अखेरिस कंपनीचे शेअर्स थोड्या घसरणीसह 1,878 वर बंद झाले.

कंपनीने काय म्हटलं? 

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांची आता 10,934 मेगावॅटची परिचालन क्षमता आहे, जी भारतातील सर्वाधिक आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात 2,848 मेगावॅट क्षमता स्थापित करण्यात आली आहे. अदानी ग्रीन एनर्जीच्या ऑपरेटिंग सेगमेंटमध्ये 7,393 MW सौर, 1,401 MW पवन आणि 2,140 MW पवन-सौर हायब्रिड क्षमतेचा समावेश आहे. 

काय म्हणाले गौतम अदानी? 

"या क्षेत्रात सर्वप्रथम 10 हजार मेगावॅटहून अधिक रिन्युएबल एनर्जी क्षमता असलेली कंपनी बनल्याचा अभिमान आहे. एका दशकापेक्षाही कमी वेळात अदानी ग्रीन एनर्जीनं हरित भविष्याची केवळ संकल्पनाच केली नाही, तर ते प्रत्यक्षात साकारही केलं," असं गौतम अदानी म्हणाले. 

"2030 पर्यंत 45,000 मेगावॅटचं (45 GW) उद्दिष्ट ठेवून, आम्ही खावड्यात जगातील सर्वात मोठा रिन्युएबल एनर्जी प्लांट प्रकल्प उभारत आहोत. खावडा हा 30,000 मेगावॅटचा प्रकल्प असून त्याला जागतिक स्तरावर कोणतीही स्पर्धा नाही," असंही त्यांनी नमूद केलं. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानी