अरुण बारसकर, सोलापूरविधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर राज्यातील साखर कारखान्यांची चाके फिरणार असून १७७ कारखान्यांनी गाळप परवान्याची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ३३ साखर कारखान्यांनी गाळप परवान्याची मागणी केली आहे.महाराष्ट्रात सध्या २३१ साखर कारखाने असून त्यामध्ये खासगी कारखान्यांची संख्या अधिक आहे. १४४ खासगी, तर ८७ सहकारी साखर कारखाने आहेत. यापैकी १७७ साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गाळपासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे.राज्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या सर्वाधिक असून यावर्षी यात दोन कारखान्यांची भर पडली आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या ३४ पैकी ३३ कारखान्यांनी गाळप परवान्याची मागणी केली आहे. बुलढाणा, अमरावती, धुळे या जिल्ह्यातील एकाही कारखान्याने गाळपास परवानगी मागितली नाही. राज्यातील १७७ साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवानगी देण्याचे प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाला सादर केले. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर व सांगली, तर पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर या पाच जिल्ह्यांतील १०५ साखर कारखान्यांपैकी ९६ कारखान्यांनी गाळप परवान्यांची मागणी केली आहे.यामध्ये एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ३३ कारखान्यांचा समावेश आहे. सोलापूरच्या ३३ कारखान्यांनी गाळप परवान्याची मागणी केली असली तरी कर्ज व अन्य कारणांमुळे अडचणीत आलेले चार ते पाच कारखाने सुरू होण्याची शक्यता कमीच असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
गाळपासाठी १७७ साखर कारखान्यांचा प्रस्ताव
By admin | Updated: October 11, 2014 04:42 IST