Join us  

खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 4:13 AM

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे खासगी चारचाकी व दुचाकींच्या विक्रीतील वाढ व्यावसायिक वाहने व आॅटोरिक्षा यांच्यापेक्षा कमी आहे.

मुंबई -  चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात खासगी वाहनांच्या विक्रीचे प्रमाण घटले आहे. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे खासगी चारचाकी व दुचाकींच्या विक्रीतील वाढ व्यावसायिक वाहने व आॅटोरिक्षा यांच्यापेक्षा कमी आहे. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सने (सिआम) ही आकडेवारी जाहीर केली.एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान देशभरात १ कोटी ७१ लाख १२ हजार २३६ वाहनांची विक्री झाली होती. यावर्षी याच काळात १ कोटी ९५ लाख ७५ हजार २५५ वाहनांची विक्री झाली. त्यात १४.३९ टक्के वाढ झाली. पण यावर्षी खासगी चारचाकी वाहनांच्या विक्रीत मागीलवर्षीपेक्षा फक्त ६.१० टक्के वाढ झाली. दुचाकी वाहनांच्या विक्रीतही फक्त ११.१४ टक्के वाढ झाली. त्याचवेळी व्यावसायिक वाहनांची विक्री ३५.६८ टक्क्यांनी व तीन चाकी आॅटोरिक्षांची विक्री ३१.९७ टक्क्यांनी वाढली.चालू आर्थिक वर्षात इंधन १३ ते १५ टक्के महाग झाले आहे. परिणामी नागरिकांनी नवीन वाहन खरेदीऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीशी निगडित व्यावसायिक वाहने व आॅटोरिक्षा यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये मध्यम व अवजड वाहतुकीच्या वाहनविक्रीत ४२.८० टक्क्यांची तर हलक्या मालवाहतूक वाहनांची विक्री ३१.५६ टक्के वाढली. तीन चाकी वाहनश्रेणीत सर्वाधिक ३६.७१ टक्के वाढ झाली.एप्रिल ते आॅक्टोबरदरम्यान देशभरातील वाहनांची निर्यात २४.१० टक्के वाढली. पण खासगी प्रवासी वाहनांची निर्यात ३.२८ टक्के घटली. तीन चाकी वाहनांच्या निर्यातीत तब्बल ६२.९९ टक्के वाढ झाली.

टॅग्स :पेट्रोलदिवाळी