विजयकुमार सैतवाल, जळगावबाजारात नवीन गहू दाखल होण्याच्या वेळी यंदाही अवकाळी पावसाने फटका दिल्याने गव्हावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता बाजारपेठेत व्यक्त होत आहे. शिवाय हरभरा, उन्हाळी दादर, बाजरी, मूग, तूर यांच्यासह धणे, जिरे, हळद, बडीशोप यांची आवकही लांबणीवर पडली आहे. उन्हाअभावी माल तयार होत नसल्याने त्यांच्या भावाबाबतही अनिश्चितता आहे. ‘बारमाही’ झालेल्या पावसामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. दर महिन्याला होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांवर त्याचा परिणाम होत आहे. आता पुन्हा दहाच दिवसात दोन वेळा झालेल्या या अवकाळी पावसाने बाजारपेठेचे गणित बिघडविले आहे. धान्य खरेदीच्या हंगामाची लगबग सुरू होण्याच्याच वेळी पावसाने फटका दिल्याने धान्याची आवक लांबणीवर पडली आहे. एरव्ही होळीपर्यंत बाजारात नवीन गहू दाखल होतो. मात्र यंदा होळी होऊन आठवडा उलटला तरी बाजारात गहू आला नाही. राज्यभरात जवळजवळ सर्वच ठिकाणी, तसेच गव्हाची मुख्य बाजारपेठ असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात येथेही अवकाळी पावसाचा फटका बसून काढलेला माल उन्हाअभावी वाळू शकला नाही व जे पीक उभे होते ते वादळी तडाख्यात आडवे झाल्याने गहू तयार होऊ शकत नसल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती उन्हाळी दादरची झाली आहे. खान्देशातील चाळीसगाव, धरणगाव, धुळे, शिरपूर येथून मध्यप्रदेशसह कोल्हापूर, सोलापूर व राज्यातील इतर ठिकाणी पोहोचणाऱ्या या दादरची अवकाळी पावसाने प्रतीक्षा वाढविली आहे. नाशिक, मध्यप्रदेश येथून येणारी उन्हाळी बाजरी, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून येणारा उन्हाळी मूग, विदर्भातून येणारी तूर, सांगली व आंध्र प्रदेशातून येणारी हळद, गुंजा (गुजरात) येथून येणारे जिरे व शोप, महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थानातील कोटा येथून येणारे धणे हा माल उन्हाअभावी तयार होऊ शकत नाही.
‘अवकाळी’मुळे धान्याची आवक लांबणीवर
By admin | Updated: March 14, 2015 08:37 IST