मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज २९,८४४.१६ अंकांच्या सार्वकालिक उच्चांकाला स्पर्श केल्यानंतर नफेखोरीमुळे अखेरीस ४९८.८२ अंकांनी आपटला. या आपटीमुळे सेन्सेक्स २९,१८२.९५ अंकावर बंद झाला.गेल्या तीन आठवड्यात एका दिवसात सेन्सेक्समध्ये झालेली ही सर्वांत मोठी घसरण आहे. तथापि, सरकारचा कोल इंडियाच्या शेअर विक्रीचा कार्यक्रम यशस्वी राहिला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १४३.४५ अंक वा १.६० टक्क्यांनी घटून ८,८०८.९० अंकावर आला. दिवसभराच्या उलाढालीत तो आपली सार्वकालिक उच्चांकी पातळी ८,९९६.६० अंकावरही गेला होता. रेलिगेअर सिक्युरिटीजचे अध्यक्ष (किरकोळ वितरण) जयंत मांगलिक यांनी सांगितले की, ‘देशांतर्गत बाजारात आज जोरदार घसरण नोंदली गेली. नकारात्मक जागतिक संकेत व नफेखोरीने बाजार आपटला.’ विविध श्रेणीतील निर्देशांकात बँकिंगमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तो तीन टक्क्यांनी कोसळला. यानंतर ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन, भांडवली वस्तू, धातू व तेल आणि गॅस श्रेणीतही घसरण नोंदली गेली आहे.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तेजीसह उघडल्यानंतर सुरुवातीच्या उलाढालीत एकावेळी आपली सार्वकालिक उच्चांकी पातळी २९,८४४.१६ अंकापर्यंत गेली. तथापि, विक्रमी पातळीवर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी व देशांतर्गत कोषांनी नफेखोरी केल्याने एकावेळी तो दिवसाची नीचांकी पातळी २९,०७०.४८ अंकापर्यंत कोसळला होता.सेन्सेक्स अखेरीस ४९८.८२ अंक वा १.६८ टक्क्यांनी कोसळून २९,१८२.९५ अंकावर बंद झाला. ६ जानेवारी २०१४ नंतर एका दिवसात सेन्सेक्समध्ये झालेली ही सर्वांत मोठी आपटी आहे. त्या दिवशी सेन्सेक्स ८५४.८२ अंकांनी कोसळला होता.आशियाई बाजारातही घसरणीचा कल राहिला. हाँगकाँग, चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया व तैवानच्या बाजारात ०.०९ ते १.५९ टक्क्यांची घसरण नोंदली गेली. जपानचा बाजार ०.३९ टक्क्यांनी उंचावला. युरोपीय बाजारात प्रारंभी घसरणीचा कल होता. सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी २२ मध्ये घट राहिली, तर आठ तेजीत होते. (प्रतिनिधी)
नफेखोरीने सेन्सेक्स ४९९ अंकांनी घसरला
By admin | Updated: January 31, 2015 02:23 IST