मुंबई : विक्रमी झेप घेतल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक नफेखोरीच्या फटक्याने घसरला. धातू, भांडवली वस्तूंसोबत ऊर्जा क्षेत्रात झालेल्या नफेखोरीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसअखेर ४७.२५ अंकांनी घरंगळत २७,८६८.८३ वर आला. बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सार्वकालिक उंची गाठली होती.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही दिवसअखेर १.३० अंकांनी घसरत ८,३३७.०० वर आला. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दिवसभर चढ-उतार अनुभवास आला. बीएसई निर्देशांक मध्यंतरी २७,९८०.९ आणि २७,७३९.५६ दरम्यान वर-खाली होत सरतेशेवटी २७,८६८.६३ अंकावर स्थिरावला.ओईसीडीच्या अहवालात भारताचा जीडीपी वृद्धीदर ५.४ टक्के राहील, असा अंदाज वर्तविण्यात आल्याने बाजारात मूड राहिला नाही. तथापि, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकादारांनी दिलेल्या पाठबळामुळे घसरणीला आळा बसला, असे रेलिगेर सिक्युरिटीजचे अध्यक्ष (रिटेल वितरण) जयंत मंगलिक यांनी सांगितले.आशियाई बाजारातही संमिश्र वातावरण होते. युरोपीय बाजाराचीही अशीच स्थिती होती. तैवान, जपान आणि दक्षिण कोरियाचा बाजाराचा निर्देशांक वधारला, तर हाँगकाँग, चीन आणि सिंगापूर शेअर बाजारात घसरण झाली. तथापि, डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, ओएनजीसी, भारती एअरटेल आणि इन्फोसिसचे शेअर्स वधारले. बुधवारी बाजारात ४,४१०.८१ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. शुक्रवारच्या सत्रात मात्र हा आकडा ३,९४८.५३ कोटी रुपयांवर आला. (प्रतिनिधी)
नफेखोरीने शेअर बाजाराला लागली ओहोटी
By admin | Updated: November 8, 2014 01:35 IST