Join us
Daily Top 2Weekly Top 5

वस्तू उत्पादन उच्चांकावर

By admin | Updated: April 5, 2016 00:30 IST

भारतातील वस्तू उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर मार्चमध्ये आठ महिन्यांच्या उच्चांकावर गेला असल्याचे उद्योग जगतातील एका प्रतिष्ठित मासिक सर्वेक्षणातून समोर आले आहे.

नवी दिल्ली : भारतातील वस्तू उत्पादन क्षेत्राचा वृद्धीदर मार्चमध्ये आठ महिन्यांच्या उच्चांकावर गेला असल्याचे उद्योग जगतातील एका प्रतिष्ठित मासिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. या महिन्यात कंपन्यांकडे अपेक्षेप्रमाणे मागणी नोंदली गेली. त्याचा लाभ मिळून ही वाढ झाली.उत्पादन वाढीबरोबरच महागाईच्या वाढीचे संकेतही मिळाले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून मंगळवारी जारी होणार असलेल्या पतधोरण आढाव्यात संभाव्या धोरणात्मक व्याजदर कपातीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निक्केई इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) मार्चमध्ये ५२.४ राहिला. गेल्या आठ महिन्यांतील हा उच्चांक आहे. फेब्रुवारीत हा निर्देशांक ५१.१ वर होता. या निर्देशांकातील ५0 च्यावरील आकडा तेजीचा निदर्शक आहे. ५0 च्या खालील आकडे मंदी दर्शवितात. गेल्या तीन महिन्यांपासून हा निर्देशांक ५0 च्या वर आहे. या सर्वेक्षणाशी संबंधित संस्थेच्या बाजार अर्थतज्ज्ञ आणि सर्वेक्षण अहवालाच्या लेखिका पोलिना डी लीमा यांनी सांगितले की, पीएमआय आकड्यांवरून २0१५-१६ ची शेवटची तिमाही आर्थिक वृद्धीच्या दृष्टीने चांगली राहिली, असे दिसून येते. पीएमआयमध्ये झालेली वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आशादायक बाब असल्याचे दिसून येते. मागणी मधील वाढ वस्तू उत्पादन करणाऱ्या कारखान्यांसाठी उपकारक ठरली आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.