मुंबई : भारतातून क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी खाजगी कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी अमेरिकन अॅम्बेसिडर रिचर्ड वर्मा, प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा व ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. या वेळी खाजगी कंपन्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले.क्षयरोगमुक्त भारतासाठी केंद्र सरकारने २३ एप्रिल २०१५ रोजी मोहीम हाती घेतली. या मोहिमेला खाजगी क्षेत्राचाही हातभार लागावा, यासाठी ‘मुंबई डायलॉग, क्षयरोगमुक्त भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील एका हॉटेलमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या.वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायजेशनच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी २४ हजार जणांचा मृत्यू झाला तर यंदाच्या वर्षात ६१ हजार जणांना क्षयरोगाची बाधा झाली आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी वर्मा म्हणाले, भारत क्षयरोगमुक्त करण्यासाठी अमेरिकेने आत्तापर्यंत भारताला १०० मिलियन अमेरिकन डॉलरची मदत केली असून, १५ मिलियन पीडितांना मदत केली आहे. अजूनही क्षयरोगाचा संपूर्णपणे नायनाट झालेला नाही. हे काम एकट्या सरकारचे नाही. यासाठी खासगी कंपन्यांचा सहभाग आवश्यक आहे.क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत, अशी हमी रतन टाटा यांनी केली. तर अमिताभ बच्चन यांनी या आजारामुळे होणाऱ्या वेदना विशद केल्या. ते म्हणाले, आजाराची बाधा झालेल्या रुग्णाला होणाऱ्या वेदना असह्य असतात. या आजारातून बाहेर पडण्यासाठी किमान महिना लागतो. या काळात रुग्णाची काळजी घेणे आवश्यक असते. नातलग, शेजारी व समाजातून रुग्णाला दिलासा मिळणेही गरजेचे असते. आपण एकत्र येऊन या रोगावर मात करू शकतो, अशी मला आशा आहे, असा विश्वास अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
टीबीविरुद्ध खासगी कंपन्यांची मदत
By admin | Updated: September 11, 2015 02:50 IST