Join us

भारतात प्रायव्हेट बँकिंग धोक्यात

By admin | Updated: November 28, 2015 00:04 IST

युरोपातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एचएसबीसी पीएलसी भारतातील आपली प्रायव्हेट बँकिंग शाखा बंद करणार आहे. अन्य काही विदेशी बँकांनी भारतातील आपली प्रायव्हेट बँकिंग शाखा या आधीच बंद केल्या आहेत.

मुंबई : युरोपातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एचएसबीसी पीएलसी भारतातील आपली प्रायव्हेट बँकिंग शाखा बंद करणार आहे. अन्य काही विदेशी बँकांनी भारतातील आपली प्रायव्हेट बँकिंग शाखा या आधीच बंद केल्या आहेत. एचएसबीसीच्या भारतातील प्रवक्त्याने सांगितले की, भारतातील प्रायव्हेट बँकिंगचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय बँकेने घेतला आहे. एचएसबीसी बँकेने आपला व्यवसाय अधिक सोपा करण्याचा, तसेच वृद्धी अधिक टिकाऊ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचेच प्रतिबिंब या निर्णयात दिसून येते. भारतीय प्रायव्हेट बँकिंग क्षेत्रात विदेशी बँका यशस्वी होऊ शकलेल्या नाहीत. काही वर्षांपूर्वी भारतात काम सुरू करण्यासाठी धडपडणाऱ्या बँका आता आपला व्यवसाय गुंडाळताना दिसून येत आहेत. रॉयल बँक आॅफ स्कॉटलँड आणि मॉर्गन स्टॅनले या मोठ्या बँकांनी भारतातील प्रायव्हेट बँकिंग व्यवसाय आधीच विकून टाकला आहे.एचएसबीसीच्या मुंबई येथील प्रवक्त्याने सांगितले की, बँक आपल्या क्लायंटांना एचएसबीसी प्रीमिअरमध्ये सहभागी होण्यास सांगणार आहे. ही एचएसबीसीची जागतिक पातळीवरील रिटेल बँकिंग आणि संपत्ती व्यवस्थापन करणारी शाखा आहे. एचएसबीसीच्या प्रायव्हेट बँकिंग व्यवसायात फक्त ७0 जणांना स्टाफ असल्याची माहिती आहे. बँकेने अधिकृतरीत्या मात्र या आकड्याची पुष्टी केलेली नाही. ही सेवा जवळपास गोपनीय पद्धतीने चालविली जात असल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या अधिकृतरीत्या कळणे कठीण आहे. एचएसबीसीच्या कॉर्पोरेट, रिटेल आणि इन्व्हेस्टमेंट या अन्य सेवा क्षेत्रांत मिळून जवळपास ३२ हजार कर्मचारी आहेत. (वृत्तसंस्था)प्रायव्हेट बँकिंग ही पाश्चात्त्य संकल्पना असून, अतिश्रीमंत लोकांसाठी अत्यंत खासगी पातळीवर बँकिंग सेवा त्याअंतर्गत पुरविण्यात येते. ही सेवा संपत्ती व्यवस्थापन या कक्षेत मोडते. अब्जाधीशांना त्यांचे व्यवहार गोपनीय ठेवता यावेत, यासाठी अत्यंत मर्यादित स्वरूपात बँका ही सेवा पुरवितात.