Join us  

"भारताने कोरोना नियंत्रणात आणून जगाला मोठ्या संकटातून वाचवले"; पंतप्रधान मोदी

By देवेश फडके | Published: January 28, 2021 7:03 PM

जागतिक आर्थिक मंचाद्वारे आयोजित 'दावोस अजेंडा' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदूश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. यावेळी जगभरातील ४०० मोठ्या उद्योजकांचे प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर होते. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपले विचार मांडले.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले दावोस अजेंडामध्ये विचारआगामी काळ जगातील अर्थव्यवस्थांसाठी कठीण - पंतप्रधानकोरोना नियंत्रणात आणण्यास भारताचे उपाय प्रभावी - पंतप्रधान

नवी दिल्ली : भारताने कोरोना नियंत्रणात आणून जगाला एका मोठ्या संकटातून वाचवले, असा दावा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला. जागतिक आर्थिक मंचाद्वारे आयोजित 'दावोस अजेंडा' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदूश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. यावेळी जगभरातील ४०० मोठ्या उद्योजकांचे प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर होते. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपले विचार मांडले.

अर्थव्यवस्थेच्या या मंचाला कठीण काळातही आपण कार्यरत ठेवले. जगाची अर्थव्यवस्था कशी पुढे जाईल, हा आताच्या घडीचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. भारताकडून जगासाठी सकारात्मक संदेश घेऊन आपल्यासमोर आलो आहे. कोरोनाचे संकट गहिरे असताना भारतासारख्या विकसनशील देशासाठी जगभरातून चिंता व्यक्त केली गेली, असे पंतप्रधान म्हणाले. 

कोरोना लढाईचे जनआंदोलन

कोरोनामुळे डगमगून न जाता, निराश न होता, कोरोनाशी लढा देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम भारताने हाती घेतले. देशवासीयांना संयमाने कोरोनाशी लढा देण्याची प्रेरणा दिली. कर्तव्यांचे पालन करत कोरोना लढाईला जनआंदोलनाचे स्वरुप प्राप्त झाले. यामुळे कोरोनाचा मृत्युदर कमी राखण्यास भारताला यश आले, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

आत्मनिर्भर भारताची सुरुवात

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण आणून संपूर्ण मानवतेला मोठ्या त्रासापासून वाचवले. कोरोनाचे संकट गहिरे होत चालले, तेव्हा मास्क, पीपीई कीट, टेस्ट कीट बाहेरून मागवावे लागले. मात्र, त्यानंतर आत्मनिर्भर भारताची सुरुवात झाली आणि कोरोना संकटातील गरजेच्या बहुतांश गोष्टी भारतात तयार केल्या जाऊ लागल्या. एवढेच नव्हे, तर गरजू देशाला पुरवण्यातही आल्या. कोरोना लस भारतात निर्माण केली गेली. एवढेच नव्हे, तर या कोरोना लसींचा पुरवठा करून अन्य देशातील नागरिकांचीही सेवा केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

सर्वांत मोठे कोरोना लसीकरण अभियान

१६ जानेवारी २०२१ पासून भारतात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. गेल्या १२ दिवसांत २५ लाख नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. भारताच्या हजारो वर्षांची परंपरा पुढे नेत आपली जागतिक स्तरावरील जबाबदारीही योग्य पद्धतीने पार पाडली आहे. संपूर्ण जगभरातील विमान सेवा बंद असताना भारताने लाखों नागरिकांना त्यांच्या देशात पोहोचवले. तसेच १५० हून अधिक देशांना आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात आला, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

टॅग्स :अर्थव्यवस्थापंतप्रधाननरेंद्र मोदी