Join us  

बारा वर्षांनंतर पोहोचले स्टीलचे दर ५० हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 4:47 AM

बांधकामाला गती मिळाल्याने वधारले दर

-  संजय देशमुखजालना : कोरोनानंतर आता अन्य उद्योगांप्रमाणेच स्टील उद्योगाने मोठी भरारी घेतली आहे. २००८ नंतर प्रथमच स्टीलचे प्रतिटन दर हे सर्व करांसहित ५० हजार रुपयांवर पोहोचले आहेत. बांधकाम व्यवसायाने घेतलेली झेप यासाठी कारणीभूत असून, कच्चा मालही पाहिजे त्याप्रमाणात उपलब्ध होत नसल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले. घरबांधणीसाठी लागणाऱ्या लोखंडी सळया अर्थात स्टील उद्योगात देशात जालन्याने मोठी आघाडी घेतली आहे. जवळपास १४ मोठे स्टील उद्योग आणि २२ लहान उद्योग आहेत. १४ स्टील उद्योजक हे कच्च्या आणि पक्क्या मालाचे उत्पादन करतात. तर २२ लहान उद्योग म्हणजेच रिरोलिंग मिलमधून वेगवेगळ्या आकाराच्या लोखंडी सळयांची निर्मिती होते. दररोज हजारो टन स्टीलचे उत्पादन येथे केले जाते. अंदाजित १५ हजार कोटींची गुंतवणूक या एकट्या उद्योगात आहे. असे आहेत दर घरबांधणीसाठी प्रामुख्याने ६ एम.एम.चे दर हे ४७ हजार ७०० अधिक १८ टक्के जीएसटी, ८ एम.एम. ४५ हजार अधिक जीएसटी, आणि १२ एम.एम.४४ हजार अधिक १८ टक्के जीएसटी प्रतिटन असे आहेत. तब्बल १२ वर्षांनंतर ही भाववाढ झाली असल्याची माहिती स्टील मॅन्युफॅक्चर असाेसिएशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश मानधनी यांनी दिली.