Join us

दबाव झुगारला, दर जैसे थे

By admin | Updated: August 4, 2015 23:19 IST

व्याजदरात कपात करण्यासाठी असलेली उद्योगांची आग्रही झुगारत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर ‘जैसे थे’च ठेवले आहेत. मात्र, मान्सून नियमित झाला व कृषी

मुंबई : व्याजदरात कपात करण्यासाठी असलेली उद्योगांची आग्रही झुगारत भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर ‘जैसे थे’च ठेवले आहेत. मात्र, मान्सून नियमित झाला व कृषी क्षेत्रात सुधार दिसला तर येत्या वर्षाखेरीपर्यंत व्याजदरात कपात करण्याचे संकेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिले. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने चालू आर्थिक वर्षातील तिसरे पतधोरण मंगळवारी मांडले. रेपो रेट, रिव्हर्स रेपो व कॅश रिझर्व्ह रेशो या कोणत्याही दरात कपात न करता ते कायम ठेवले आहेत. यामुळे रेपो रेट ७.२५ टक्के, सीआरआर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ६.२५ टक्के असा ‘जैसे थे’ राहिला आहे. यावेळी माहिती देताना गव्हर्नर राजन यांनी महागाई, व्याजदराचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविणे अशा अनेक मुद्यांचा पुनरुच्चार केला.राजन म्हणाले की, जानेवारी २०१६ पर्यंत महागाईचा दर ६ टक्क्यांवर आणण्याच्या दृष्टीने उपायोजना सुरू आहेत. अर्थव्यवस्थेतून सुधाराचे संकेत मिळत असले तरी महागाई आटोक्यात आणण्याचा मुद्दा प्राधान्याचा असून त्या दृष्टीने आवश्यक अशा उपायोजना करण्यावरच भर असल्याचे राजन यांनी ठामपणे सांगतिले. तर, यापूर्वी दोनवेळा व्याजदरात कपात करूनही बँकांनी तो लाभ ग्राहकापर्यंत न पोहोचविल्याबाबत पुनश्च नाराजीचा सूरही राजन यांनी आळवला. भविष्याचा विचार करता अर्थव्यवस्थेत होत असलेली सुधारणा ही सकारात्मक बाब असल्याचे सांगत, कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घसरण ही चालू खात्यातील वित्तीय तूट कमी होण्याच्या दृष्टीने पथ्यावर पडत असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)