हजारोंच्या उपस्थितीत कोल्हापूरचा शाही दसरा
By admin | Updated: October 4, 2014 22:55 IST
हजारोंच्या उपस्थितीत कोल्हापूरचा शाही दसरा
सोने लुटले : अंबाबाईची रथारूढ पूजा कोल्हापूर : विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार, घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीर निवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीची पालखी, ऐतिहासिक मेबॅक कारमधून आलेले कोल्हापूर संस्थानचे र्शीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, मालोजीराजे, आरतीनंतर बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली सलामी, आकर्षक आतषबाजी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोल्हापूरवासियांच्या डोळ्य़ाचे पारणे फेडणारा असा शाही दसरा सोहळा शुक्रवारी उत्साहात झाला. अंबाबाई तुळजाभवानीची ईश्वरी सत्ता आणि संस्थान सत्तेच्या संगमाने झालेल्या या शाही सीमोल्लंघन सोहळ्य़ाला ‘सोनं घ्या सोन्यासारखं राहा’ अशा शुभेच्छा देत नागरिकांनी सोने लुटले. आठ दिवस महिषासूरशी घनघोर युद्ध करून विजय मिळवलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा परमोच्च क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीर निवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवी रथात बसून जाते, असा या मागचा अन्वयार्थ आहे. संध्याकाळी अंबाबाई आणि तुळजाभवानी देवीच्या पालख्या आपल्या लव्याजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान झाल्या. सोहळास्थळी पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर सहा वाजून एकोणीस मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ्य़ाला सलामी देण्यात आली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी सोने लुटले. अंबाबाईची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली. नवरात्रौत्सवाची सांगता अश्विन पौर्णिमेला अंबाबाई मंदिरातील महाप्रसादाने होणार आहे. (प्रतिनिधी) --------------------फोटो : 04कोल अंबाबाई शारदीय नवरात्रौत्सवात विजयादशमीनिमित्त शुक्रवारी करवीर निवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)