Join us

वीज कामगारांना अखेर 25 टक्के वेतनवाढ मान्य

By admin | Updated: June 26, 2014 23:00 IST

- बैठकीदरम्यान वेतनवाढ करारावर स्वाक्षर्‍या

- बैठकीदरम्यान वेतनवाढ करारावर स्वाक्षर्‍या
मुंबई : तब्बल 45 टक्के वेतनवाढीच्या मागणीवर अडून बसलेल्या वीज कामगार संघटनांनी गुरुवारी अखेर 25 टक्के वेतनवाढीच्या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड मुख्यालयात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांशी झालेल्या बैठकीदरम्यान या वेतनवाढ करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.
गेल्या मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांच्यासमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान 25 टक्के वेतनवाढीबाबत चर्चा झाली. मात्र वीज कामगार संघटना 45 टक्के वेतनवाढीवर अडून बसल्या होत्या. यामुळे त्यांच्या मागण्यांचा पुनर्विचार करण्यासाठी प्रकाशगड येथील मुख्यालयात तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीदरम्यान, वीज कामगारांना मूळ वेतनाच्या 25 टक्के वाढ देण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय भत्त्यांमध्येही 25 टक्के वाढ आणि तब्बल 85 हजार वीज कामगारांना विमा कवच म्हणून 20 कोटींचे संरक्षण देण्याबाबतही मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वीज कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. (प्रतिनिधी)